

धुळे : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्यासाठी सर्व विभागांनी सतर्क राहून परस्पर समन्वयाने कार्य करावे. कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी विशेष काळजी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिले.
जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर विसपुते यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात बुधवार (दि.28) रोजी सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश शेलार आणि उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) संदीप पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, "सर्व विभागांनी मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करावीत. आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नये यासाठी नियोजनबद्ध कार्य महत्त्वाचे आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. अशावेळी प्रशासन सजग असणे अत्यावश्यक आहे."
विशेषतः महानगरपालिका व नगरपालिका प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करावे, असे त्यांनी सांगितले. आपत्ती काळात कोणताही हलगर्जीपणा होऊ नये, यासाठी सर्व कार्यालय प्रमुखांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावे आणि नागरिकांच्या तक्रारींचे निवारण तत्काळ करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. विभाग प्रमुखांनी पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, असे निर्देशही विसपुते यांनी दिले. बैठकीपूर्वी त्यांनी सर्व विभाग प्रमुखांची ओळख घेतली तसेच त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी मान्सून काळात आरोग्य यंत्रणेला सज्ज राहण्याचे आवाहन करत आवश्यक औषधसाठा ठेवण्याचे निर्देश दिले.
या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल पवार, धुळे मनपाच्या अतिरिक्त आयुक्त करूणा डहाळे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सयाजी भामरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्ता देगांवकर, उपविभागीय अधिकारी शरद मंडलीक, रोहन कुवर तसेच जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी व विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.