

धुळे : शिंदखेडा मतदारसंघात हरितक्रांती घडवणाऱ्या सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेस रु. 5329.46 कोटींच्या दुसऱ्या सुधारित प्रशासकीय मंजुरीस राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. पालकमंत्री जयकुमार रावल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून हा निर्णय अमलात आणला आहे. (sulwade jamfal yojana Lift irrigation scheme Shindkheda Dhule)
तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या अंतर्गत असलेली ही योजना धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दभाशी गावाजवळील तापी नदीवर सुलवाडे बॅरेजच्या वरच्या भागातून उपसा करून राबवली जाणार आहे. प्रकल्पामुळे शिंदखेडा तालुक्यातील 54 आणि धुळे तालुक्यातील 23 गावांतील एकूण 36,407 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. ही योजना दुष्काळप्रवण भागातील शेतजमिनींना सिंचन सुविधा देणारी असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रशासकीय मान्यता मिळाल्याने निधीअडथळा दूर होणार असून प्रकल्पाच्या अंमलबजावणीत गती येणार आहे.