

धुळे, पुढारी वृत्तसेवा: शारदीय नवरात्रौत्सवाला आजपासून (दि.३) सुरुवात झाली. या निमित्ताने नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी पहिल्या माळेला आदिशक्ती एकविरा मातेच्या आरतीचा मान धुळेच्या खासदार डॉ. शोभा दिनेश बच्छाव यांना देण्यात आला. खानदेशातील बेरोजगारी नष्ट होऊ दे, असे साकडे यावेळी खासदार बच्छाव यांनी आदिशक्ती एकविरा माता यांना घातले.
धुळे शहरातील खान्देश कुलस्वामिनी आदिशक्ती एकविरा माता मंदिरात दर्शनासाठी संपूर्ण खान्देशातूनच नव्हे. तर महाराष्ट्रासह परराज्यातून देखील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. एकविरा माता अनेक कुळांचे कुलदैवत असल्याने भाविकांची येथे मोठी गर्दी होते आहे. येथे यात्रा उत्सव भरविला जातो.
गुरुवारी पहाटे डॉ. शोभा बच्छाव दांपत्याने आदिशक्ती एकविरा मातेची मनोभावे पूजा अर्चा करीत आरती केली. खान्देशातील बेरोजगारीसह विविध अनिष्ट संकटे दूर होऊ दे, सर्वच भाविकांना सुख-समृद्धी आरोग्य लाभू दे, अशी प्रार्थना मातेच्या चरणी खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी केली . यावेळी डॉ. दिनेश बच्छाव, साळुंके व शिंदे कुटुंबीय यांच्या समवेत मंदिर समितीचे प्रमुख सोमनाथ गुरव, निलेश काटे, हर्षल सोनार आदी उपस्थित होते.