

धुळे : नागपूर सुरत महामार्गावर तामसवाडी गावाजवळ क्रुझर उलटून झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये आणखी 12 जण जखमी झाले आहेत .लग्न समारंभ आटोपून घरी परतत असताना हा भीषण अपघात झाला आहे.
तामसवाडी गावाजवळ धुळेकडे जाताना वळणावर लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारे क्रुझर वाहन क्रमांक एमएच १८ डब्ल्यू ६२२६ दुभाजकाला धडकले. चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने चार ते पाच वेळा उलटले. त्यामुळे वाहनातील सर्व १७ प्रवासी जखमी झाले. यातील चौघांचा मृत्यू झाला आहे. अपघात गावापासून जवळ घडल्याने लग्नातील मंडळी अपघात स्थळी तात्काळ दाखल झाल्याने खाजगी वाहनाने सर्व जखमींना साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जखमींपैकी तीन वर्षीय चिमुकली काव्या स्वप्निल पाटील (शिरधाने ता.धुळे) व भटाबाई साहेबराव पाटील रा. बीडगाव ता.पाचोरा यांना साक्री रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित करण्यात आले. तर अन्य १५ जखमींना धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. गंभीर जखमींपैकी वाहनचालक व अन्य एक जण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच दगावला.
या अपघाताची साक्री पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली असून साक्री रुग्णालयात जिल्ह्याचे शल्यचिकित्सक रवींद्र सोनवणे यांनी भेट देऊन जखमींवर करण्यात आलेल्या उपचाराची व पुढील कार्यवाहीची माहिती घेतली.
अपघातातील जखमींमधे गितेश्वरी अविनाश पाटील, सुशिलाबाई शांताराम पाटील, कल्याणी रविंद्र पाटील, पंकज पाटील, चेताली पृथ्वीराज पाटील, प्राजक्ता नितिन पाटील, जागृती छोटू पाटील, दिपाली रोहिदास पाटील, भूमिका गुलाब पाटील, वैष्णवी महेंद्र पाटील, भिकुबाई शिवदास पाटील, मनीषा संतोष बाविस्कर, नयना सुभाष पाटील, इंदुबाई पांडुरंग पाटील, पमाबाई भिला पाटील यांचा समावेश आहे.