धुळे : कानबाई मातेचा उत्सव आटोपून मध्यप्रदेशातील घरी जात असताना नियंत्रण सुटल्याने कारने ट्रकला धडक दिली. या अपघातात दांपत्यासह त्यांची तरूण मुलगी ठार तर दोनजण गंभीर जखमी झाले. हा अपघात मुंबई-आग्रा महामार्गावर मध्यप्रदेशातील सेंधव्याजवळील जामली येथील टोल प्लाझाजवळ घडला.
वरला तालुक्यातील खारिया येथील शिवाजी तुकाराम बाविस्कर (महाजन, वय 49) अनेक वर्षापासून आपल्या कुटुंबासह पिथमपूर येथे राहत होते. ते एका कंपनीत काम करत होते. कानबाई माता उत्सवासाठी हे कुटुंब खारिया येथे आले होते. खारियाजवळील आंबे गावात कानबाई उत्सव साजरा करून ते कारने पिथमपूरला घरी परतत होते. सेंधवा टोल प्लाझाजवळ कारवरील नियंत्रण सुटल्याने तिने विरुद्ध दिशेला जाऊन कंटेनर (एचआर 68 बी 8141) ला धडक दिली. या अपघातात कारचालक शिवाजी तुकाराम बाविस्कर (49), नीता उर्फ ललिता शिवाजी बाविस्कर (39), अनुराधा शिवाजी बाविस्कर (18) हे ठार झाले. तर लालचंद्र सीताराम माळी, गौरव शिवाजी बाविस्कर हे जखमी झाले.