

पिंपळनेर, जि.धुळे : वन विभागातील महिला कर्मचारीकडे शरीरसुखाची मागणी करत खंडणी मागणारा संशयित उमाकांत अहिरराव याच्या विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात काल मध्यरात्री गुन्हा दाखल झाला. पीडित महिलेने फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार,पीडित महिला ही वन विभागात वन रक्षक पदावर कार्यरत आहे.
साक्री तालुक्यातील नांदर्खी पोस्ट उमरपाटा येथील वन विभागाची बीट तपासणी सुरु होती. त्यावेळेस उमाकांत अहिरराव तिथे आला.त्याने पीडित महिलेला एका बाजूला बोलाविले. पीडितेला त्याने धमकाविले. शरीरसुखाची मागणी करत काही पैसे दिले तर मी हे सर्व थांबवू शकतो. तक्रारी अर्ज मागे घेवू शकतो, असे सांगितले. परिणामी पीडित महिला ही घाबरली. तिला चक्कर येवू लागल्याने तिची तब्येत बिघडली. तिला लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर पीडितेने पिंपळनेर पोलीस ठाणे गाठले आणि फिर्याद दाखल केली.
त्यानुसार काल मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास संशयित उमाकांत लक्ष्मण अहिरराव (रा.देगाव ता. साक्री) याच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदिप संसारे करीत आहेत.