

धुळे : ग्रामस्थांच्या एकीमुळे उजाड झालेल्या जंगलाचे प्रतिकूल परिस्थीतीवर मात करीत नंदनवन फुलविता आले. बारीपाडा गावाचा चेहरामोहरा बदलविता आला. त्यामुळे मिळालेला पद्मश्री पुरस्कार म्हणजेच बारीपाडा ग्रामस्थांचा आणि धुळे जिल्हावासियांचा सन्मान असल्याची प्रतिक्रीया सामाजिक कार्येकर्ते चैत्राम पवार (Chaitram Pawar) यांनी व्यक्त केली. दरम्यान चैत्राम पवार यांचे कार्य सर्वांसाठी दिशादर्शक असून त्यांना देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार हा जिल्हावासियांसाठी अभिमास्पद आहे. त्यांच्यामुळे धुळे जिल्ह्याच्या नावलौकीकाची ऐतिहासिक नोंद झाली असल्याचे महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांनी सांगितले. यावेळी कुणाल पाटील यांनी बारीपाडा येथील जंगल,शेतीत केलेल्या वनसंवर्धन, जलसंर्धन कामांची पहाणी करुन माहिती जाणून घेतली.
देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार मानले जाणार्या पुरस्कारांची प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला घोषणा करण्यात आली. त्यात धुळे जिल्हयातील बारीपाडा(ता.साक्री) येथील सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. चैत्राम पवार यांना मिळालेला पुरस्कार हा जिल्ह्याचा नावलौकीक वाढविणारा असल्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांनी धुळे तालुका आणि जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्टच्यावतीने चैत्राम पवार यांची बारीपाडा येथे भेट घेत सत्कार केला.
भेटी दरम्यान कुणाल पाटील यांनी आणि पद्मश्री पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार यांच्याशी दिलखुलास चर्चा केली. यावेळी चैत्राम पवार यांनी उजाड माळरान ते स्वयंपूर्ण बारीपाडाचा प्रवास उलगडून दाखविला.
कुणाल पाटील यांच्याशी चर्चा करतांना पद्मश्री चैत्राम पवार यांनी त्यांच्या आगामी उपक्रमाबाबत माहिती देतांना सांगितले कि, बारीपाडासह परिसरात मोहाच्या झाडांची मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. या मोहाच्या झाडाच्या फूल तसेच बियांपासून लवकरच तेल, मॉश्चराईज, चॉकलेट,साबण, वाईनचे उत्पादन घेतले जाणार आहे. दरम्यान प्रायोगिक स्वरुपात साबणाचे उत्पादन सुरु झाले असल्याचे पवार यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मोहाच्या फूलापासून तयार करण्यात आलेला साबण कुणाल पाटील यांना भेट दिला. दरम्यान या उत्पादनांमुळे बारीपाडा येथील शेतकर्यांची मोठ्या प्रमाणात भरभराट होणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.
वनकृषी केंद्रच्या धर्तीवर केंद्र शासनाने वन विज्ञान केंद्र स्थापन करण्यात यावेत यासाठी केंद्राकडे मागणी केली होती. त्यानुसार देशात विविध राज्यात आवश्यक त्याठिकाणी 6 वन विज्ञान केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. या वन विज्ञान केंद्राच्या माध्यमातून वन विभागात बांबू लागवड कशी करावी, कुठले वृक्ष लावायचे, जंगलातील कुठले वृक्ष किती उत्पादन देईल यांचे संशोधन करुन त्याचे प्रशिक्षण केंद्रही या विज्ञान केंद्रातून व्हावे म्हणून वन विज्ञान केंद्राची मदत होणार आहे. मात्र ते लवकरात लवकर सुरु करुन ते यशस्वी होणे गरजचे असल्याचेही चैत्राम पवार यांनी कुणाल पाटील यांच्याशी चर्चा करतांना सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार यांचा सत्कार करतांना महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांनी सांगितले की, पवार यांना मिळालेला पुरस्कार हा जिल्ह्यासाठी अभिमानस्पद असून चैत्राम पवार यांच्या कार्याचा गौरव अंतरराष्ट्रीय पातळीवर केला जावा असे त्यांचे कार्य असल्याचे कुणाल पाटील यांनी सत्कारावेळी सांगितले.
यावेळी माजी खा.बापू चौरे, धुळे बाजार समितीचे संचालक साहेबराव खैरनार, संचालक विशाल सैंदाणे, साहित्यिक जगदिश देवपूरकर, बारीपाडा सरपंच अनिल पवार, प्रविण चौरे, साक्री तालुका काँग्रेस अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, जयदेवराव शिंदे, जि.प.सदस्य विश्वास बागुल, प्रज्योत देसले, प्रकाश शिंदे, अक्षय देसाई, उत्तम देशमुख तसेच बारीपाडा येथील सरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.