

धुळे : रस्ते व परिवहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे आमदार तथा राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री अमरिश पटेल यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गाचे काम लवकरच सुरू होणार आहे. याबाबत शिरपूर येथे भूमिपूजन करणार असल्याचे नितीन गडकरी यांनी आमदार अमरिशभाई पटेल यांना रविवारी (दि.२३) आश्वासन दिले.
दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या भेटीत मंत्री नितीन गडकरी यांनी आमदार अमरिश पटेल यांच्या आग्रहास्तव अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्ग मंजूर केला. व त्याचे काम लवकरच सुरू करत असल्याचे सांगून मी स्वतःहून आपल्या शिरपूर येथे या महामार्गाच्या कामाचे भूमिपूजन करणार असल्याचे सांगितले.
आमदार अमरिश पटेल यांनी सातत्याने अंकलेश्वर-बऱ्हाणपूर रस्ता कामासाठी पाठपुरावा सुरु ठेवला होता. जुलै २०२२ मध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एन.एच.ए.आय.) कडे ट्रान्सफर करण्याबाबत कार्यवाहीचे काम झाले होते. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केंद्र शासनाच्या परिवहन खात्याला "ना हरकत प्रमाणपत्र" (एन.ओ.सी.) दिल्याने राष्ट्रीय महामार्ग आता चौपदरी होऊन सर्वांसाठी मोठ्या प्रमाणात लाभदायक ठरणार आहे.
पटेल यांच्या प्रयत्नाने अंकलेश्वर पासून तळोदा, प्रकाशा, शहादा, शिरपूर, चोपडा, यावल, रावेर पर्यंत अंकलेश्वर-बऱ्हाणपूर हा राज्य मार्ग-४ आता राष्ट्रीय महामार्ग "एन एच-753 बी" होणार आहे. हा राज्य मार्ग-४ आता राष्ट्रीय महामार्ग कडे ट्रान्सफर करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ७ जुलै २०२२ रोजी केंद्र शासनाच्या परिवहन मंत्रालय नवी दिल्ली येथील महासंचालक तथा विशेष सचिव यांना "ना हरकत प्रमाणपत्र" (एन.ओ.सी.) दिल्याने राष्ट्रीय महामार्ग आता चौपदरी होऊन मोठ्या प्रमाणात सोयीसुविधा उपलब्ध होऊन सुरक्षित व सुरळीतपणे वाहतूक देखील सुरु होईल. मंत्री नितीन गडकरी धुळे येथे गेल्या विविध प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी आले असताना आ. अमरिशभाई पटेल यांनी या महामार्गाबद्दल आपल्या भाषणात चर्चा करून अंकलेश्वर ते नागपूर हे अंतर १०० कि.मी. कमी होऊन प्रकाशामार्गे येणारी ही वाहतूक सर्वांच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार असल्याचे सांगितले होते.