

धुळे : धुळे येथील प्रसिद्ध श्री एकविरा देवी यात्रोत्सव यंदा हजारो भाविकांच्या उपस्थितीत शांततेत पार पडला. दरवर्षी या यात्रेत दागिने व मोबाईल चोरीसारख्या गुन्ह्यांची नोंद होते. मात्र यंदा प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या विशेष नियंत्रण यंत्रणेने ९० टक्क्यांहून अधिक गुन्ह्यांवर आळा घालण्यात यश मिळवले.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून व आमदार अनुप अग्रवाल यांच्या सहकार्याने, एआय प्रणालीसह सीसीटीव्ही प्रणाली विकसित करण्यात आली. यासाठी देवपूर पोलीस ठाण्याच्या देखरेखीखाली तात्पुरती कंट्रोल रूम स्थापन करण्यात आली होती. यात्रास्थळात एकूण १६ कॅमेरे बसवण्यात आले. आठ मंदिर परिसरात आणि आठ गर्दीच्या भागात हे कॅमेरे असविण्यात आले होते.
या प्रणालीत १७० संशयित गुन्हेगारांची माहिती आधीच अपलोड करण्यात आली होती. त्यामुळे कोणताही संशयित कॅमेऱ्यांच्या रडारवर आल्यास अलर्ट मिळत होता. अशा ९ वेळा अलर्ट मिळाल्यानंतर पोलीसांनी तत्काळ हस्तक्षेप करून संभाव्य गुन्हे थांबवले. यंदाच्या यात्रेदरम्यान देवपूर पोलीस ठाण्यात एकही दागिने चोरी, पाकीटमारी, मोबाईल चोरी, किंवा भांडणाची नोंद झाली नाही. फक्त यात्रास्थळाबाहेरील अंधाऱ्या भागातून चार दुचाकी चोरीच्या घटना घडल्या असून त्याची चौकशी सुरू आहे. मागील वर्षी यात्रेदरम्यान १२ महिलांचे दागिने चोरीला गेले होते व ८ मोटरसायकल चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यात महिला चोर व विधी संघर्षीत बालकांचा संशय आहे.
यावर्षी एआय प्रणालीमुळे केवळ चोरीच नव्हे, तर गर्दीचे व्यवस्थापन, महिलांची सुरक्षा, दंगली किंवा चेंगराचेंगरीसारख्या प्रकारांवरही नियंत्रण ठेवणे शक्य झाले. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय अधिकारी राजकुमार उपासे, व एलसीबी निरीक्षक श्रीराम पवार यांच्या देखरेखीखाली संपूर्ण यंत्रणा यशस्वीपणे कार्यरत करण्यात आली. धुळे जिल्ह्यात पहिल्यांदाच एवढ्या व्यापक प्रमाणावर एआय व सीसीटीव्हीच्या मदतीने यशस्वी बंदोबस्त करण्यात आला. ही यंत्रणा भविष्यात इतर ठिकाणीही लागू करता येईल, असे संकेत या यशस्वी प्रयोगातून मिळाले आहेत.