

धुळे | पिस्तुलाचा धाक दाखवून घरफोडी करणाऱ्या गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यामधील अट्टल गुन्हेगारास अटक करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत त्याने तीन गुन्हे केल्याची कबुली दिली असून त्याच्या विरोधात गुजरात राज्यात आणि नंदुरबार जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांनी दिली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तपणे केल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
साक्री तालुक्यातील सामोडे शिवारात श्याम शांताराम भदाणे यांचे लक्ष्मी ऍग्रो इंडस्ट्री या नावाने पत्र्याचे गोदाम आहे. या गोदामातून सुमारे दोन लाख 17 हजार 800 रुपये किमतीचे वेल्डिंग मशीन, रोटर, नांगर व अन्य ऐवज चोरीस गेला होता. या संदर्भात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांनी सुरू केला. यावेळी त्यांना हा गुन्हा गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यामधील उच्छल येथील रहिवासी रमेश शिवा वसावा याने केल्याची माहिती मिळाली. वसावा हा पिंपळनेर नजीकच्या ओटाबारी भागात असल्याची माहिती देखील त्यांना मिळाली. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांच्या संयुक्त पथकाने तातडीने छापा मारून वसावा याला ताब्यात घेतले. त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडून पिस्तूल आणि काडतूस मिळून आले. प्राथमिक चौकशीतच वसावा याने सामोडे येथे घरफोडी केल्याची माहिती दिली.
या गुन्ह्याची चौकशी सुरू असताना पोलीस निरीक्षक पवार यांना वसावा याने पिंपळनेर ते सामोडे रोडवरील भारत गैस गोडावुनजवळील शेतातील कांदयाचे चाळीत ठेवलेले सोयाबीनची चोरी केल्याची माहिती मिळाली. या संदर्भात देखील पिपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा देखील वसावा याने केल्याची कबुली देऊन नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील पांगरण येथे लपवून ठेवलेल्या सोयाबीनच्या 70 गोण्या काढून दिल्या आहेत.
त्याप्रमाणे वसावा यास पुन्हा विश्वासात घेवुन विचारपुस केली असता बोपखेल येथील प्रभात बिअर शॉपी मधुन इन्व्हेंटर व बॅटरी चोरी बाबत पिंपळनेर पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा देखील त्याने केल्याची माहिती पोलिसांना दिली. पांगरण ता. नवापूर जि. नंदुरबार येथे लपवुन ठेवलेले एक मायक्रोटेक्स कंपनीचे इन्व्हेंटर व मॅसिमो कंपनीची बैटरी काढून दिली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने चौकशी केली असता या घोरफोड्याने गुजरात, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात घरफोडी आणि अन्य गंभीर प्रकारचे सात गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पिंपळनेर पोलीस ठाणेचे सपोनि किरण बर्गे , पोउनि ईश्वर शिरसाठ, असई संजय पाटील, पोहेकॉ सदेसिंग चव्हाण, तुषार सुर्यवंशी, देवेंद्र ठाकुर, निलेश पोतदार, सुनिल पाटील, अतुल निकम, हर्षल चौधरी, कैलास महाजन तसेच पिंपळनेर पोलीस ठाणेचे पोकॉ. चेतन गोसावी, रविंद्र सुर्यवंशी, कैलास कोळी यांनी केली आहे.