

धुळे, पुढारी वृत्तसेवा: ट्रकमधून गांजाची तस्करी करण्याचा प्रकार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी हाणून पाडला आहे. या कारवाईत पाच लाखाचा गांजा जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली. तस्करी केल्या प्रकरणात अटक केलेल्या चालकाकडून अधिक माहिती घेण्यात येणार असून त्याला गांजा देणारा गुड्डू हा आता पोलिसांच्या रडारवर आला आहे. Dhule News
चाळीसगाव रोड चौफुली येथे आलेल्या एम एच 18 ए ए 1268 या क्रमांकाच्या ट्रकमध्ये गांजाची खेप जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक प्रकाश पाटील तसेच संजय पाटील, संदीप सरग, सुरेश भालेराव, रविकिरण राठोड, गुणवंत पाटील, निलेश पोद्दार, सुशील शेंडे, सागर शिर्के, हर्षल चौधरी, पथकातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने या ट्रकला शोधून चालक आबिद हुसेन शेख याला ताब्यात घेतले. Dhule News
या ट्रकची तपासणी केली असता ट्रकच्या केबिनमधून सुमारे पाच लाख रुपये किंमतीचा गांजा आढळून आला. अधिक चौकशी केली असता आबिद हुसेन यांनी ट्रकमध्ये जळगाव जिल्ह्यातून सरकी भरली. यानंतर धुळ्यातून फटाक्याचे 153 बॉक्स गाडीत लोड केल्यानंतर त्याला धुळ्यातील गुड्डू नावाचा युवक भेटला. या गुड्डू ने त्याला गांजाचा साठा दिला. हा गांजा सुरत येथे गेल्यानंतर संबंधित व्यक्तीला पोहोच होणार होता. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी झडप घालून आबिद हुसेन शेख याला ताब्यात घेऊन गांजाची तस्करी उघडकीस आणली. आता पोलीस पथक धुळ्यातील गुड्डू च्या मागावर असून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. या संदर्भात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा