

धुळे; पुढारी वृत्तसेवा : धुळ्यात गुंगीकारक औषधांची तस्करी करणाऱ्या रॅकेटवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात एक मेडिकल चालक आणि वैद्यकीय प्रतिनिधीसह चार जणांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. या संबंधित मेडिकलचा परवाना रद्द करण्यासंदर्भातील पत्रव्यवहार केला जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे.
धुळे शहरात गुंगीकारक औषधांचे रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मोहाडी परिसरातील दंडेवाले बाबा नगर भागात राहणारा विकास उर्फ विकी मोहन चौधरी याला ताब्यात घेतले. त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरातून 26 हजार रुपये किमतीचे प्रतिबंधित गुंगीकारक घटक असलेल्या 170 बाटल्या तसेच 5120 किमतीच्या गुंगीकारक गोळ्यांच्या 160 स्ट्रीप आढळून आल्या. त्याच्या चौकशीतून हा माल त्याने देवपुरातील रिंकू मेडिकल मधील लोकेश चौधरी यांच्याकडून खरेदी केल्याची माहिती मिळाली. त्यामुळे लोकेश चौधरी याला ताब्यात घेतले असता त्याने गुंगीकारक औषधांचा साठा मालक प्रमोद येवले याच्याकडे असल्याचे सांगितले. त्यानंतर येवले यांच्या घरातून देखील 36 हजार 750 रुपये किमतीच्या 210 बाटल्या जप्त करण्यात आल्या.
या घटनेचा अधिक तपास केला असता गुंगीकारक औषधांचा हा साठा वैद्यकीय प्रतिनिधी मुकेश आनंदा पाटील याच्याकडून घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मुकेश पाटील याच्या घरातून तीस हजार रुपये किमतीच्या गुंगीकारक गोळ्या सापडल्याची.
या कारवाईमध्ये सुमारे एक लाख तीन हजार सहाशे तीस रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला असून विकास उर्फ विकी मोहन चौधरी, लोकेश अरुण चौधरी ,प्रमोद अरुण येवले, मुकेश आनंदा पाटील या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या कारवाईमध्ये प्रथमच मेडिकल चालक आणि वैद्यकीय प्रतिनिधी यांना आरोपी करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली असून आता संबंधित विभागाला मेडिकलचा परवाना रद्द करण्यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याची माहिती देखील यावेळी श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकात शिंदे यांच्यासह सहाय्यक निरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी , उपनिरीक्षक योगेश राऊत तसेच अमरजीत मोरे ,संजय पाटील, श्याम निकम, दिलीप खोंडे ,संदीप सरग, पंकज खैरमोडे ,चेतन बोरसे, प्रशांत चौधरी, जितेंद्र वाघ ,किशोर पाटील आदी यांचा समावेश होता.