धुळे : नागपूर-सुरत महामार्गावर ट्रक लुणाऱ्या दोघांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश

धुळे : नागपूर-सुरत महामार्गावर ट्रक लुणाऱ्या दोघांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश

Published on

धुळे; पुढारी वृत्तसेवा : नागपूर सुरत महामार्गावर पाईपने भरलेला ट्रक चोरून नेणाऱ्या दोघांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. यावेळी ट्रकसह गाडीतील पाईप जप्त करण्यात आल्याची माहिती आज (दि. २७) पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे.

धुळे तालुका पोलीस ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देताना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशात राहणारे मोहम्मद इरशाद कुरेशी हे रायपूर छत्तीसगड येथून सीजी 06-जीडी 1882 या क्रमांकाच्या ट्रकमध्ये पाईप घेऊन धुळे मार्गे सुरतकडे जात होते. यावेळी धुळे तालुक्यातील फागणे गावच्या जवळ असणाऱ्या फाट्यावर महाराष्ट्र पासिंग मधील एका कारमध्ये आलेल्या तीन ते चार अनोळखी युवकांनी ट्रकसमोर कार आडवी लावून गाडीला कट का मारला या कारणावरून ट्रक चालक कुरेशी यांच्याशी वाद घातला. यानंतर ट्रक चालक आणि क्लिनर यांना मारहाण करून गाडीतून बाहेर फेकून दिले. त्यांनंतर चोरांनी त्यांच्या खिशातील रोख रक्कम तसेच 15 लाखाचा ट्रक आणि 14 लाख 45 हजार रुपयांच्या पाईप घेऊन पोबारा केला.

या घटनेनंतर ट्रक चालक कुरेशी यांनी पोलीस ठाण्याला तक्रार दिली. त्यानुसार लुटीचा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे, तसेच तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या पथकाने तपास सुरू केला. यावेळी प्रमोद पाटील यांच्यासह उपनिरीक्षक अनिल महाजन, हवलदार प्रवीण पाटील तसेच नितीन चव्हाण, किशोर खैरनार, कुणाल पानपाटील, उमेश पाटील, विशाल पाटील यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. दरम्यान मोहाडी परिसरात हा ट्रक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे त्यांनी ट्रक जवळ गिरीश योगेश गायकवाड आणि राकेश वसंतराव पाटील या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत ट्रक लुटीत या दोघांचा सहभाग असल्याचा प्राथमिक तपासात निदर्शनास आले आहे. त्यामुळे या दोघांना या गुन्ह्यात अटक करण्यात आल्याची माहिती देखील धिवरे यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news