

धुळे; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात घोषित करण्यात आलेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या सवलती व उपाययोजना तातडीने लागू करण्यात याव्यात आणि जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी अंमलबजावणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमुळे बाधित होणाऱ्या आपदग्रस्तांना तातडीने मदत देणे शक्य व्हावे यासाठी अशा प्रस्तावांवर निर्णय घेण्याकरिता कायमस्वरूपी मंत्रिमंडळ उपसमिती गठित करण्यात आली आहे. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या समितीच्या झालेल्या बैठकीत राज्यातील कमी पर्जन्यमान झालेल्या महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करून तेथे सवलती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार धुळे तालुक्यातील सर्व महसुली मंडळात दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. धुळे तालुक्यात पुरेसा पाऊस न झाल्याने खरीप हंगाम हातातून गेला असून नद्या, नाले कोरडे आहेत. अनेक लघु, मध्यम पाटबंधारे प्रकल्प पूर्ण भरलेले नाहीत त्यामुळे तालुक्यात आतापासूनच पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असून जनावरांना चारा आणि पाणी देण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. साधारण जून २०२४ पर्यंत पिण्याचे पाणी, जनावरांना चारा उपलब्ध करुन देणे ही सर्वांसाठी एक कसोटी ठरणार आहे. अशावेळी शासन आणि प्रशासनाने काटेकोर नियोजन करुन तालुक्यातील जनतेला दिलासा द्यावा.
संबंधित महसुली मंडळात उपाय योजना करण्यासाठी शासनाने त्या जिल्हाधिकाऱ्यांना अंमलबजावणी अधिकारी म्हणून प्राधिकृत केले असून आपण आपल्या स्तरावर निर्णय घेऊन धुळे तालुक्यात जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू विज बीलात 33.5% सूट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे या उपाययोजना व सवलती लागू करण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाने मंजूर केलेल्या या उपाययोजना व सवलती तातडीने लागू केल्या तर तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी अशा सर्व घटकांना दिलासा मिळणार असल्याचे आ. कुणाल पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.