धुळे : मराठा आरक्षण आंदोलनास एमआएमचे आमदार फारुक शाह यांचा पाठींबा | पुढारी

धुळे : मराठा आरक्षण आंदोलनास एमआएमचे आमदार फारुक शाह यांचा पाठींबा

धुळे; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला आरक्षण मिळवण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धुळ्यात देखील साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाला आज धुळ्याचे एमआयएम चे आमदार फारुक शाह यांनी पाठिंबा दिला आहे. यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यपाल यांना पत्र पाठवण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे. त्याचप्रमाणे आरक्षण देण्यास टाळाटाळ करणाऱ्या राज्य शासन आणि भारतीय जनता पार्टीवर टीका केली आहे.

धुळ्याच्या जेल रोडवर सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत आज धुळ्याचे एम आय एम चे आमदार फारुक शाह यांनी आंदोलन स्थळी जाऊन मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. यावेळी त्यांनी आरक्षणाला टाळाटाळ करणाऱ्या राज्य शासनातील तीनही पक्षांवर टीका केली आहे.

मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे दुसऱ्यांदा आंतरवाली सराटी येथे आंदोलन करित आहेत. मनोज जरांगे यांनी आरंभलेल्या आंदोलनास महाराष्ट्रातील प्रत्त्येक जिल्ह्यात चालेल्या आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे.

महाविकास आघाडीचे सरकार असतांना आमचे सरकार येवू द्या, फक्त दोन महिन्यात मराठा आरक्षण देतो, असे म्हणणारे भाजपाचे नेते सत्ता हातात येवून सव्वा वर्ष झाले .तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवू शकले नाही.हे अपयश झाकण्यासाठी आंदोलन चिरडण्याचा सरकारचा केविलवाणा प्रयत्न यापूर्वी सरकारने केला होता. भाजपाचे सत्ताधारी कायमच मराठा आरक्षणाबद्द्ल मराठा समाजाला गाजर दाखवत आलेले आहे. आणि याचा जाब विचारल्यावर लाठीचार्ज आणि आंदोलकांवर गंभीर गुन्हे दाखल केले जातात. यापूर्वी सुमारे पाच वर्षांपुर्वी नवी मुंबईतील मराठा मोर्चा आंदोलकांवर कलम ३०७ सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते.त्यावेळी देखील राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते. आता देखील राज्याचे गृहमंत्री ना.देवेंद्र फडणवीसच आहेत.यानिमित्तानेआंदोलक मराठा तरुणांवर गंभीर गुन्हे दाखल करायचे आणि त्यांना जीवनातून उठवायचे हि संघ-भाजपाची कुटील नीती समोर आलेली आहे. असा आरोप यावेळी आमदार शाह यांनी केला आहे.

आंतरवाली सराटी येथील आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अमानूष लाठी हल्य्याचा जाहीर निषेध धुळे जिल्हा एआयएम पक्षाने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून केला होता. आणि मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठींबा देला होता. त्यामुळे आता देखील एमआयएम पक्षाने मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला असल्याचे आमदार शहा यांनी सांगितले.

ओबीसी आरक्षण अबाधित ठेवून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, धनगर-मुस्लिम यांना देखील आरक्षण देण्यात यावे,या मागण्या कायम ठेवून आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यात आला.याप्रसंगी पाठिंबा पत्र देतांना नगरसेवक नासिर पठाण,नगरसेवक गणी डॉलर,नगरसेवक सईद बेग,नगरसेवक आमिर पठाण,आणि सकल मराठा समाजाचे सुधाकर बेंद्रे, भानुदास बगदे , विनोद जगताप ,भोलाभाऊ वाघ,विकास बाबर, निंबा मराठे संदीप पाटोळे, बाजीराव खैरनार , मनोज ढवळे,भैया शिंदे , सौ शुभांगीताई पाटील, सौ हेमाताई हेमाडे, राजू इंगळे, अशोक पाटोळे, मोहन टकले, विवेक बागुल, विलास ढवळे,प्रकाश चव्हाण, वीरेंद्र मोरे ,अशोक सुडके, गोविंद वाघ, संदीप सूर्यवंशी , आदी उपस्थित होते.

Back to top button