

पिंपळनेर,जि.धुळे : जेसीबी देण्याच्या कारणावरुन सशस्त्र 17 जणांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या हल्लेखोरांनी घरात घुसून तोडफोड केली होती.
साक्री तालुक्यातील निजामपूर येथील वानाबाई सुका कोळेकर (वय 38 रा.राणेनगर) यांच्या फिर्यादीनुसार जेसीबी देण्याच्या कारणावरुन मच्छिंद्र भागा गोरे, भुरा तांबे यांच्यासह 17 जणांनी लाठ्याकाठ्या, लोखंडी पाईप, कोयता, कुऱ्हाडीने वानाबाई यांच्या कुटुंबीयांवर हल्ला केला.
या हल्ल्यात लहानू माने, तुकाराम माने, कृष्णाबाई नगारे, अर्जुन माने, दशरथ माने हे गंभीर जखमी झाले. हल्लेखोरांनी वानाबाई यांच्या घरावर दगडफेक करत घरात घुसून तोडफोड केली. अर्जुन माने यांच्या शेतातील पीक नांगरून ठिबकचे साहित्य देखील जाळले. हल्ला करण्याचे कारण अस्पष्ट असून मच्छिंद्र गोरे याच्यासह 17 जणांविरुद्ध निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.