

धुळे : धुळे तालुक्यातील पुरमेपाडा शिवारात मुंबई आग्रा महामार्गावर हवाला चे एक कोटी पन्नास लाख रुपयाची लुट प्रकरणात सहचालकच मास्टरमाइंड असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी या सहचालकासह आणखी तिघांना अटक केली आहे. या चौघांकडून 42 लाखाची रोकड हस्तगत करण्यात यश आले आहे. या सर्व आरोपींना 16 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश झाले आहेत. दरम्यान या गुन्ह्यात आणखी चौघांचा समावेश असून त्यांच्या शोधासाठी दोन पथके रवाना करण्यात आली आहे.
धुळे तालुक्यातील पुरमेपाडा शिवारात सर्विस रोडवर ही घटना घडली होती. सुरत येथील रहिवासी असणारे कल्पेश पटेल आणि सहचालक भरतभाई भालिया यांनी स्कॉपोंओने (क्रमांक-एम एच - 43- सीसी -0264) लखनऊ येथून रोकड घेऊन मुंबई आग्रा महामार्गाने मुंबई येथे जाण्यासाठी निघाले होते. ही स्कार्पिओ धुळे तालुक्यातील पूरमेपाडा गावाजवळ पोहोचली असता गाडीला स्विफ्ट कारने ओव्हरटेक केले. यानंतर चौघा चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून पटेल यांना गाडीतून खाली उतरवून स्विफ्ट कार मध्ये बसवून महामार्गाकडे निघून गेले. त्यानंतर आलेल्या आणखी एक कारमधून तिघांनी भालिया यांना देखील स्कार्पिओ मधून उतरवून सोबत घेऊन गेले.
अर्धा ते पाऊण तासानंतर भालिया आणि पटेल यांना महामार्गावर सोडून देण्यात आले. तर त्यांची गाडी देखील पूरमेपाडा शिवारात बेवारस आढळून आली. मात्र या गाडीतील रोकड लंपास केली गेली. त्यामुळे या दोघांनी प्रथम मालेगाव येथील पोलीस ठाणे व त्यानंतर धुळे तालुका पोलीस ठाण्यात येऊन या घटनेची माहिती दिली. प्राथमिक अवस्थेमध्ये या गाडीतून चार कोटी रुपये चोरीस गेल्याचे सांगितले गेले. मात्र प्रत्यक्षात फिर्याद देत असताना पटेल यांनी दीड कोटी रुपये चोरट्यांनी लांबवल्याची माहिती दिली. तसेच हे पैसे एग्रीकल्चर कंपनीचे असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. त्यानुसार आठ चोरट्यांच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
धुळे जिल्ह्यात दरोड्याचा हा प्रकार घडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार आणि तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय पाटील यांना तातडीने या गुन्ह्याचा उलगडा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार दोन्ही अधिकाऱ्यांनी पथके तयार करून चोरट्यांच्या मागावर रवाना करण्यात आले. दरम्यान या गुन्ह्याचा तपासा अंतर्गत पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी तक्रारदार पटेल आणि सहचालक भालिया यांची देखील प्राथमिक चौकशी सुरू केली . ही चौकशी सुरू असतानाच सहचालक भालिया हा धुळ्यातून अचानक निघून गेला. त्याच्या अशा वागण्यामुळे पोलीस निरीक्षक पाटील यांना त्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी दिलेल्या पत्त्याच्या माहितीनुसार पाटील यांनी एका पथकाला सुरत येथे रवाना केले. या पथकाने दुसऱ्या दिवशी भालिया याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्यांनी आणखी तिघांची नावे सांगितली. त्यामुळे या तिघांना देखील सुरत शहरातून ताब्यात घेण्यात आले. या चौघांच्या ताब्यामधून 42 लाखांची रोकड देखील हस्तगत करण्यात आली.
पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी केलेल्या तपासात सहचालक भालिया आणि पटेल हे लखनऊ येथून आळीपाळीने स्कार्पिओ गाडी चालवत मुंबईकडे निघाले होते. पटेल याच्या ताब्यातून भालिया याने शिरपूर मधून गाडी चालवण्यास ताब्यात घेतली. त्यानंतर त्याने आधीच ठरलेल्या प्लॅन प्रमाणे चोरट्यांना पुरमेपाडा शिवारातील लोकेशन दिले. त्यानुसार चोरट्यांनी येऊन चोरीचा बनाव तयार केला. आणि रोकड लांबवली. या सर्व तपासातून सहचालक भालिया हाच या गुन्ह्यातील सूत्रधार असल्याचे दिसून आले आहे. या गुन्ह्याचा तपासामध्ये पथकातील सपोनि विवेक पवार, हवालदार नितीन मच्छिद्र चव्हाण, कुणाल पानपाटील,उमेश पवार, ललित खळगे, सुमित ठाकुर, विलास बागुल, चेतन कंखरे, विशाल पाटील, किशोर खैरनार, कुणाल शिंगाणे, प्रतिक देसले, रविंद्र सोनवणे, गजेंद्र मुंडे, सुरेन्द्र खांडेकर, प्रमोद पाटील, रविंद्र राजपूत यांनी देखील सुरत मध्ये आरोपींना तातडीने ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातील रोकड हस्तगत करण्यात मोठे परिश्रम दाखवले याबाबत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या पथकाचे कौतुक केले.