धुळे | भारत निवडणूक आयोगाने राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर करून राज्यात 15 ऑक्टोबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून गेल्या एक महिन्यात धुळे जिल्ह्यात ‘सी-व्हिजिल ॲप’ वर एकूण 54 तक्रारी प्राप्त झाल्या असून या सर्व तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेमार्फत देण्यात आली आहे.
निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार, नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता यावी, यासाठी भारत निवडणूक आयोगाने ‘सी-व्हिजिल सिटीझन ॲप’ विकसित केले आहे. या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर पहिल्या 100 मिनिटांत कार्यवाही केली जाते. तसेच निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून केंद्रीय निरीक्षक , खर्च निरिक्षक , सामान्य निरीक्षक , पोलीस निरीक्षक यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
धुळे जिल्ह्यात 15 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर, 2024 या एक महिन्याच्या कालावधीत ‘सी-व्हिजिल ॲप’ वर एकूण 54 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 30 तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून 24 तक्रारी चुकीची असल्याने 6 तक्रारी जिल्हा स्तरावर तर 18 तक्रारी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर फेटाळण्यात आल्या आहे. निकाली काढण्यात आलेल्या तक्रारींपैकी सर्वाधिक तक्रारी या धुळे शहर विधानसभा मतदार संघात 17, साक्री विधानसभा मतदार संघात 3, धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघात 7, शिरपूर 2 तर शिंदखेडा मतदार संघात 1 तक्रार प्राप्त झाली आहेत. यापैकी 23 तक्रारींवर विहित वेळेत म्हणजेच 100 मिनिटांच्या आत कार्यवाही करण्यात आली आहे. तर उर्वरित तक्रारीही त्वरीत निकाली काढण्यात आल्या आहेत.
सजग नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे ‘सी-व्हिजिल ॲप’ हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपव्दारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाव्दारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येत असल्याचेही निवडणूक शाखेमार्फत कळविले आहे.