धुळे; पुढारी वृत्तसेवा: 'अमर रहे…, अमर रहे… वीर जवान मनोज माळी अमर रहे…'च्या घोषात आज (दि.९) वाघाडी, (ता. शिरपूर) येथे वीर जवान मनोज माळी यांना हजारो नागरिकांनी साश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला.
भारतीय सैन्य दलात सिक्कीम येथे कार्यरत लान्सनायक मनोज माळी यांना 6 जुलैरोजी सिक्कीम येथे उंच डोंगराळ प्रदेशात कर्तव्य बजावत असताना त्यांचा अचानक पाय घसरला. ते थेट 500 ते 600 फूट खोल दरीत कोसळून जखमी झाल्याने त्यांना वीरमरण आले. त्यांचे पार्थिव आज वाघाडी येथे आणण्यात आले. त्यानंतर सजविलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यानिमित्त ग्रामस्थांनी अंगणात रांगोळ्या रेखाटल्या होत्या. शालेय विद्यार्थी हातात तिरंगा घेवून 'अमर रहे…, अमर रहे….. वीर जवान मनोज माळी अमर रहे'सह भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देत होते.
वीर जवान मनोज माळी यांचे पार्थिव अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आल्यानंतर आमदार काशिराम पावरा, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा मेजर डॉ. निलेश पाटील, तहसीलदार महेंद्र माळी, भूपेशभाई पटेल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, सैनिक कल्याण संघटक रामदास पाटील यांच्यासह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. पोलिस दल आणि सैन्य दलाच्या तुकडीने हवेत गोळीबाराच्या तीन फैरी झाडत मानवंदना दिली. माजी सैनिकांनीही वीर जवानास अभिवादन केले.
वीर जवान मनोज माळी यांच्या भावाने मुखाग्नी दिला. आमदार पावरा व इतरांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी वीर जवान मनोज माळी यांचे कुटुंबीय, सैन्य दलाचे अधिकारी, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, नातेवाईक, आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा