धुळे, पुढारी वृत्तसेवा : मराठी माणसांसंदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या विधानाशी आम्ही सहमत नसल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दोंडाईचा येथे दिली आहे. दोंडाईच्या येथे विविध विकास कामांचे उद्घाटन आणि उद्योगपती सरकारसाहेब रावल यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांचे आगमन झाले होते. यावेळी पत्रकारांची बोलताना त्यांनी राज्यपाल यांच्या विधानाशी सहमत नसल्याचे मत व्यक्त केले आहे. महाराष्ट्राच्या विकासात व वाटचालीमध्ये मराठी माणसाचं कार्य आणि श्रेय हे सर्वाधिक आहे.
तसेच उद्योगाच्या क्षेत्रात देखील मराठी माणसाने केलेली प्रगती ही जगभरात पोहोचली असून मराठी माणसाचे नाव झाले आहे. हे देखील खरे आहे की, वेगवेगळ्या समाजाचे कॉन्ट्रीब्युशन आपणास नाकारता येणार नाही. गुजराती मारवाडी व इतर कुठल्याही समाज यात असेल. पण महाराष्ट्राच्या जडणघडणीत मराठी उद्योजक साहित्यिक वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींचा सहभाग सर्वात जास्त आहे.
मला असे वाटते की ,एकूणच या संपूर्ण बाबीला आपण पाहिले तर कुठेतरी एखाद्या समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर अनेक वेळा अतिशोक्ती अलंकार वापरला जातो. तशाच प्रकारे राज्यपाल हे बोलले असावे. मला विश्वास आहे की, त्यांच्या मनात देखील मराठी माणसाबद्दल श्रद्धा आहे. त्यांनाही पूर्णपणे जाणीव आहे की, मुंबई किंवा महाराष्ट्र व देशाच्या विकासात मराठी माणसांचा सहभाग मोठा असल्याची त्यांना जाणीव असल्याचे मत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केले. राज्यपाल नेमके काय बोलले याचा खुलासा ते करतील असे देखील त्यांनी सांगितले.