नाशिक, पुढारी वृत्तसेवा :
क्या नाम पता क्या मेरा सून प्रतापसिंग तू जरा,
चीरती हूं दुश्मन का सीना, मै वो गोलीं हू,
भीमराज की बेटी मैं तो जय भीमवाली हूँ..'
या गाण्यावर लहान-थोरांसह आया-बायांना थिरकायला लावणारे आणि महिलांमध्ये आत्मभान जागविणारे भीमशाहीर, कवी, गीतकार, संगीतकार आणि आंबेडकरी चळवळीतील कवी, गायकांचे मार्गदर्शक व महाकवी वामनदादा कर्डक यांचे पट्टशिष्य प्रतापसिंग बोदडे (वय ७४) यांचे शुक्रवारी (दि. ३) मुक्ताईनगर ( जि. जळगाव) येथे सकाळी १२ च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.
ही वार्ता कळताच चळवळीतील कवी, गायकांनी मुक्ताईनगरकडे धाव घेत, एका पर्वाचा अंत झाल्याची व 'भीमराज की बेटी' पोरकी झाल्याची भावना व्यक्त केली. प्रतापसिंग बोदडे यांच्या पार्थिवावर शनिवारी (दि. ४) मुक्ताईनगर येथे सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा गायक कुणाल बोदडे, तीन मुली असा परिवार आहे.
एम.ए. (इंग्रजी) असे शिक्षण असलेले प्रतापसिंग दादा रेल्वेत क्लर्क पदावर कार्यरत होते. भारदस्त आणि कव्वाली बाज असलेल्या आवाजातून त्यांनी फुले-शाहू-आंबेडकर आणि शिवरायांच्या विचारांची पेरणी केली. आयुष्यभर चळवळीशी बांधिलकी जपणारा ऊर्जस्वर गायक सोडून गेल्याने कधीही न भरणारी पोकळी निर्माण झाली आहे.
'माझ्या कंठात गंधार स्वर, आहे भीमराव आंबेडकर', 'काळ ऐसा चालून येवे, लिहिता लिहिता प्रतापसिंग जावो', 'घरा – घरा मधी दिलं स्वाभिमानी जीणं, हेच काम केलं इथे भीमजयंतीनं', 'गुलमोहरी रूपाच्या भीमाला, साजनी गुलमोहरी मिळाली', 'दोनच राजे इथे गाजले' अशी अनेक भन्नाट आणि अजरामर गाणी प्रतापसिंग दादांनी लिहिली, संगीतबद्ध केली आणि पुढील काळातही ही गाणी प्रत्येकाच्या मनावर राज्य करतील, अशा भावनाही दादांच्या निधनाच्या वार्तेनंतर चळवळीतील कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहेत.