कै. बलभीमअण्णा जगताप क्रीडानगरी (नगर) :
आजमितीला गावोगावची खेळाची मैदाने ओस पडत चालली आहेत. नव्या पिढीला पुन्हा मैदानाकडे वळविण्यासाठी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा स्तुत्य उपक्रम ठरणार आहे. आजही कुस्तीला राजकीय पाठबळ मिळणे आवश्यक आहे. स्पर्धेचे आयोजक आमदार संग्राम जगताप यांनी उत्कृष्ट व शानदार आयोजन करून महाराष्ट्रात इतिहास घडवला आहे, असे गौरवोद्गार पद्मश्री पोपटराव पवार यांनी काढले.
कै. बलभीमअण्णा जगताप क्रीडानगरीमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी सायंकाळी दिमाखदार सोहळ्यात झाले. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी आशिष येरेकर, आयुक्त यशवंत डांगे, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार अरुण जगताप, माजी आमदार भीमराव धोंडे, भाजपचे अभय आगरकर, नगरसेवक महेंद्र गंधे, राष्ट्रवादीचे संपत बारस्कर, पै. सुभाष लोंढे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, हिंदकेसरी योगेश दोडके, महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे, अशोक शिर्के, सईद चाऊस, कुस्तीगीर संघटनेचे संदीप भोंडवे, मेघराज कटके, माजी उपमहापौर गणेश भोसले, संजय चोपडा, प्रकाश भागानगरे, विनीत पाऊलबुद्धे, धनंजय जाधव, निखील वारे, प्रवीण घुले, साहेबराव घाडगे, अभिजीत खोसे, उपमहाराष्ट्र केसरी अनिल गुंजाळ, संजय चोपडा आदी उपस्थित होते.
आ. जगताप म्हणाले, की या स्पर्धेचा दर्जा वाढावा व स्पर्धेचा नावलौकिक वाढावा यासाठी बारकाईने नियोजन केले आहे. अनेक दानशूरांनी यासाठी हातभार लावला आहे. माझे आजोबा बलभीमअण्णा जगताप यांनी कायम कुस्तीगीरांना मदत व सहकार्य केले आहे. त्यांच्या पश्चात वडील व चुलत्यांनी हे काम केले. मी व भाऊ ही परंपरा पुढे चालवत आहोत.
कुस्तीगीर संघटनेचे जिल्हा सचिव डॉ. संतोष भुजबळ यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले. खजिनदार शिवाजी चव्हाण यांनी आभार मानले.
उपमहाराष्ट्र केसरीलाही नोकरी द्या
महाराष्ट्र केसरी किताब पटकावणार्या मल्लाला शासकीय नोकरीत सामावून घेतले जाते. त्याच पद्धतीने द्वितीय व तृतीय येणार्यांनाही शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी शासनाकडे करणार असल्याचे कुस्तीगीर संघटनेचे जिल्हाध्यक्ष आमदार संग्राम जगताप म्हणाले.