

नगर : माळीवाडा बस स्थानकावर प्रवासी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणार्या महिलेला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून पाच ग्रॅमची बोरमाळ जप्त केली. सविता गोविंद औताडे (रा. आनंदनगर सिंहगड जि. पुणे, मुळ रा. आष्टा कासार ता. लोहार जि. धाराशिव) असे त्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मंगळवारी(दि.25) दुपारी निलावती विठठलराव लोढे (वय 66, रा. चौपाटी कारंजा आयडीबीआय बँकेशेजारी, दिल्लीगेट, अहिल्यानगर) ह्या माळीवाडा बस बसस्थानक येथून मुलीला भेटण्यासाठी पंढरपुर येथे जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्या बसमध्ये जात असताना गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी बॅगमध्ये वरच्या कप्प्यात पाकिट ठेवले होते. त्यात सोन्याची बोरमळा होती. ते पाकिट कोणीतरी चोरून नेले, अशी फिर्याद त्यांनी पोलिस ठाण्यात दिली. या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना मंगळवारी सायंकाळी कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांना माहिती मिळाली की, एक महिला बसस्थानकामध्ये गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने चोरत आहेत. त्यानुसार पोलिस पथक बसस्थानकात गेले. महिला पोलिस हेडकॉन्स्टेबल रोहिणी दरंदले व पथकाने त्या महिलेला बसस्थानकातून ताब्यात घेतले.
तिने वरीलप्रमाणे नाव सांगितले. तिच्याकडून चोरीची पाच गॅ्रमची बोरमाळ हस्तगत केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, सहायक पोलिस निरीक्षक योगिता कोकाटे, पोलिस अंमलदार राजेंद्र औटी, विशाल दळवी, दशरथ थोरात,रोहिणी दरंदले, अभय कदम, दीपक रोहोकले, तानाजी पवार, वर्षा पंडीत व दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडु यांच्या पथकाने केली.