

श्रीरामपूर : नेवासा येथील एका खासगी रुग्णालयामध्ये गर्भपिशवीच्या ऑपरेशनसाठी दाखल करण्यात आलेल्या रेश्मा शामू ईरले (वय 35) यांचा मृत्यू झाला. मात्र डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच रेश्मा यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी श्रीरामपूर तालुका वडार समाजाने अपर पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, की रेश्मा इरले यांना 18 एप्रिल रोजी दुपारी 12 च्या दरम्यान नेवासा येथील खासगी रुग्णालयामध्ये गर्भपिशवी ऑपरेशनसाठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी 21 एप्रिलला ऑपरेशन करण्याचे सांगितले होते. मात्र, 20 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता अचानक ऑपरेशन करण्यात आले. यावेळी भूलतज्ज्ञांनी भूल दिली. मात्र, रुग्णाच्या नातेवाइकांचा आरोप आहे की, भूल दिली असताना ओव्हरडोस झाल्यामुळे रेश्मा यांची प्रकृती अत्यवस्थ झाली.
प्रकरण बिघडल्याचे लक्षात येताच, रुग्णाच्या पतीकडून तातडीने सह्या घेत अहिल्यानगर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांना हलविण्यात आले. त्या वेळी अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने व्हेंटिलेटर लावले आणि नातेवाइकांना ती जिवंत असल्याचे भासविले. रात्री 12 वाजता मात्र तिचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. नातेवाइकांचा आरोप आहे की, प्रत्यक्षात तिचा मृत्यू नेवासा येथील रुग्णालयामध्येच झाला होता. या प्रकरणावर विश्वास नसल्याने नातेवाइकांनी रेश्मा यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये केले.
या गंभीर प्रकारानंतर श्रीरामपूर तालुका वडार समाजाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक दीपक चव्हाण, माजी नगरसेविका वैशाली चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अपर पोलिस अधीक्षक कार्यालयात निवेदन देऊन दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्वरित अटक करावी, अशी मागणी केली आहे.
यावेळी रितेश धोत्रे, मच्छिंद्र धोत्रे, रामदास धोत्रे, विशाल धोत्रे, सागर म्हस्के, कैलास म्हस्के, गोरख धोत्रे, सूरज धोत्रे, अनिल धनवटे, नवनाथ धोत्रे, राहुल फुलारे, आदित्य वाघ, अमोल पवार, अक्षय धनवटे, सुरेश धोत्रे, सचिन धोत्रे, किरण उईके, श्याम म्हस्के, पांडू व्यवहारे, योगेश धोत्रे आदी उपस्थित होते.