

नगर/एकरुखे: शिर्डी येथील आंतरराष्ट्रीय विमान तळ परिसरातील काकडी (ता. राहाता) शिवारात दिघे वस्ती येथे दरोडेखोरांच्या हल्ल्यात बाप-लेक ठार झाले असून एक महिला जखमी झाली आहे. या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने 12 तासांत टेम्पोमध्ये पळून जाणार्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
कृष्णा भोसले (वय 30), साहेबराव भोसले (वय 60, दोघे रा. दिघे वस्ती, पिंप्री रोड, काकडी ता.राहाता) अशी ठार झालेल्या दुर्दैवी बाप-लेकाची नावे आहेत. तर, संदीप दहाबाड (वय 18), जगन किरकिरे (वय 25, दोघे रा. तेलीम्बरपाडा, ता.मोखाडा, जि. पालघर) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, काकडी (ता. कोपरगाव) शिवारातील दिघे वस्तीवर शुक्रवारी (दि. 4) रात्री दरोडेखोरांनी जबरी चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश करून धारदार हत्याराने प्राणघातक हल्ला करीत कृष्णा भोसले, साहेबराव भोसले यांना ठार मारले.
तर, दरोडेखोरांच्या हल्ल्यात साकरबाई भोसले (वय 55) या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरोडेखोरांनी मोटारसायकल व मोबाईल चोरून नेला. या हल्ल्यात घरातील गजुबाई मारुती दिघे या आजी बचावल्या. त्याना ऐकू येत नसल्याने व दिसत नसल्याने हल्लेखोरांच्या लक्षात आल्या नाहीत, असे समजते. याबाबत राहाता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक शिरीष वमने यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देवून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना निर्देश दिले.
त्यानुसार आहेर यांनी सहायक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात, उपनिरीक्षक तुषार धाकराव, अनंत सालगुडे, पोलिस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बापूसाहेब फोलाणे, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, गणेश लोंढे, संदीप दरंदले, अमृत आढाव, प्रमोद जाधव, जालिंदर माने, बाळासाहेब खेडकर, रमीजराजा आत्तार, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, प्रशांत राठोड, भगवान थोरात, सुनील मालणकर, बाळासाहेब गुंजाळ, अरूण मोरे, उमाकांत गावडे व चंद्रकांत कुसळकर यांचे पथक नेमून आरोपींच्या शोधाकामी रवाना केले.
तांत्रिक विश्लेषण व बातमीदारांच्या माहितीनुसार वरील गुन्हा करणारे संशयित टेम्पोमधून सिन्नर मार्गे नाशिककडे जात असल्याची माहिती 5 एप्रिल 2025 रोजी पोलिस पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने पळशी टोलनाका, सिन्नर, (जि.नाशिक) येथे सापळा रचून संशयित एका टेम्पोमधून संशयितांना ताब्यात घेतले.
संदीप दहाबाड, जगन किरकिरे अशी त्यांनी नावे सांगितली. त्याच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता शुक्रवारी रात्री साडेबाराच्या दरम्यान काकडी विमानतळ परिसरामधील एका घरामध्ये जाऊन दोन - तीन जणांना लाकडी दांडक्याने व फावड्याने मारहाण केल्याची कबुली दिली. वरील आरोपींना तपासकामी राहाता पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले. तपास पथकास संशयित आरोपीतांचा शोध घेणेकामी सिन्नर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड व पथकाने मदत केली.
दूध संकलकामुळे घटना उघडकीस
साहेबराव भोसले व कृष्ण भोसले यांच्यापैकी कोणीच शुक्रवारी शनिवारी सकाळी दूध घालण्यासाठी दूध संकलन केंद्रावर आले नाही. त्यामुळे डेअरी चालकाने त्यांच्या शेजारच्या शेतकर्यांला फोन करून विचारपूस करण्यास सांगितले. त्यानुसार तो शेतकरी भोसले यांच्या घरी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार घडकीस आला.