अतिशय चुरशीच्या झालेल्या राहुरी मतदार संघातील निवडणुकीमध्ये आ.तनपुरे व कर्डिले यांची दुरंगी लढत झाली. 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असताना मतदानामध्ये वाढ झाल्याचे दिसले. दरम्यान, वाढलेला टक्का नेमका कोणाच्या पथ्थ्यावर पडणार, राहुरीत किती.., नगर तालुक्यात कोण चालललं, पाथर्डीत कोणाला लीड.. इत्यादी चर्चांनी आता गुलाबी थंडीत पारावरही गप्पा रंगलेला दिसत आहेत.
राहुरीत एकूण 2 लाख 41 हजार 672 मतदारांनी (74.58 टक्के) मतदान केले. स्व. रामदास धुमाळ महाविद्यालय येथे शनिवारी (दि. 23) रोजी 22 फेर्यामध्ये मतमोजणी पार पडणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शाहुराज मोरे यांनी दिली. राहुरी विधानसभा मतदार संघामध्ये आ.प्राजक्त तनपुरे व माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी आरोपांच्या फैर्या झाडत निवडणूक दडपशाही व दहशतीच्या नावावर आणली. इतकेच नव्हे तर प्रतिदिन नेते, कार्यकर्त्यांचे प्रवेश व पाठींब्याच्या नियोजनाने निवडणुकीत अक्षरशः रंगत आणली होती. कर्डिले-तनपुरे गटाचा वाढलेला सुप्त राजकीय संघर्ष पोलिस प्रशासनासाठी चांगलाच डोकेदुखी ठरला. प्रशासनाकडे वेगवेगळ्या तक्रारींमुळे निवडणुकीचा तापलेला पारा प्रचारात दिसून आला. माजी आ. कर्डिले यांनी तनपुरेंवर मंत्री पदाच्या कार्यकाळात निष्क्रियतेचा आरोप करीत मतदार संघातील प्रलंबित प्रश्नांवर प्रचार रंगविले. तर दुसरीकडे आ.तनपुरे यांनीही कर्डिले यांच्या 10 वर्ष आमदारकीच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांच्या प्रश्नांचे आव्हान देत गुन्हेगारी, अशिक्षित उमेदवार म्हणून कर्डिलेंवर आरोपांची तोफ डागली होती. मतदार संघात कधी तनपुरे तर कधी कर्डिले प्रचारात आघाडी घेत असताना शेवट पर्यंत नेमकी हवा कुणाची हे उघड होऊ शकले नाही.
ऐन मतदानाच्या शेवटच्या दिवशीही अनेक सर्वसामान्य मतदारांनी आपले गुप्त मतदान करीत नेमके कोणाचे ‘काम’ केले, यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिल्याचे दिसले. त्यामुळे निकालाचा सस्पेन्स आणखी वाढलेला दिसला.
राहुरी मतदार संघ हा राहुरी, नगर व पाथर्डी या तीन तालुक्यांमध्ये व्यापलेला आहे. प्रत्येक तालुक्याचे वेगवेगळ प्रश्न असल्याने उमेदवारांचे नियोजन महत्वाचे ठरले. निवडणूक प्रशासनाशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, 20 तारखेला मतदान होऊन त्याच दिवशी पहाटे पर्यंत स्व. धुमाळ महाविद्यालय येथे मतपेट्या सुरक्षितरित्या ठेवण्यात आल्या आहेत. मतपेट्यांना सुरक्षेचा कडा पहारा देण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने उपाययोजना केलेल्या आहे.
राहुरी तालुक्यामध्ये मतदारांचा मोठा उत्साह जाणवला. राहुरीत सर्वाधिक 1 लक्ष 46 हजार 13 (77.83 टक्के) मतदारांनी मतदान केले. त्यानंतर पाथर्डीमध्ये 41 हजार 852 (72.54 टक्के मतदान झाले. परंतू नगर तालुक्यात केवळ 53 हजार 639 (69.48 टक्के) मतदान झाले. त्यामुळे दोन्ही गटाकडून आमचाच नेता 5 ते 20 हजाराच्या फरकाने निश्चित विजयी होणार असल्याचे दावे ठोकत आहे.
निवडणूक निर्णयाधिकारी मोरे तथा तहसीलदार नामदेव पाटील यांनी सांगितले की, 125 कर्मचार्यांच्या नियोजनाने 308 बुथची मतमोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. 22 फेर्यांमध्ये राहुरी मतदार संघाचा अंतिम निकाल जाहिर होणार आहे. 14 टेबलवर इव्हीएम मशिन तर 6 टेबलवर टपाली मतदान मोजणी होणार आहे. सकाळी मतमोजणी 8 वाजता पोस्टल बॅलट मोजणी होणार आहे. पहिल्या दोन फेर्यांसाठी 2 तास लागेल. त्यानंतर 20 मिनीटाच्या अंतराने प्रत्येक फेरीचा निकाल जाहिर होणार आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत पूर्ण निकाल जाहिर होईल.
यंदाच्या विधानसभेत आ. तनपुरे व कर्डिले यांनी प्रचारामध्ये मोठ्या राजकीय नेत्यांपेक्षा स्थानिक राजकीय नेत्यांवर अधिक विश्वास दर्शवित प्रचारसभा घेतल्या. कर्डिलेंसाठी माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सभा घेतल्या. तर आ. तनपुरेंसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सभा घेतली. तर स्थानिक पातळीवर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, खा. नीलेश लंके यांनी दोन्ही उमेदवारांसाठी प्रचार केले.