‘अवकाळी’ शेतकर्‍यांचे गणित बिघडविणार?

गहू, कांदाउत्पादक शेतकर्‍यांची लगबग; कडबा झाकण्यासाठी धावपळ; आंबा फळबागाला फटका
Ahilyanagar news
शेतकर्‍यांमधील चिंता वाढलीpudhari
Published on
Updated on

नगर : हवामानात झालेल्या बदलामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांची मोठी धांदल उडाली आहे. पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने अगोदरच कांद्याचे दर कोसळलेल्या शेतकर्‍यांवर अवकाळीचे ‘ढग’ दिसत आहेत. गहू, कांदाउत्पादकांची लगबग सुरू झाली असून, शेतकर्‍यांमधील चिंता वाढली आहे. सोसाट्याच्या वार्‍यामुळे आंब्याला मोठा फटका बसला आहे.

तालुक्यात बहुतांशी भागात गावरान कांदा काढणीला आला आहे, तर उशिरा पेरण्या झालेला गहूही सोंगण्याचे काम सुरू आहे. अशातच गेल्या तीन-चार दिवसांपासून वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे शेतकर्‍यांची धाकधूक वाढली आहे.

बाजारात कांद्याचे भाव गडगडल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत होती. त्यातच अवकाळीचे संकट समोर ठाकल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे.

रब्बी हंगामातील सुमारे वीस हजार हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड करण्यात आली होती. त्यामधील बहुतांशी कांदा हा काढणीला आलेला आहे, तर काही भागात कांदा काढून शेतातच पडलेला आहे. उशिरा पेरण्या झालेल्या गव्हाच्या सोंगणीचे काम सुरू असून, अवकाळी पाऊस आल्यास कांद्याबरोबरच गहू, लसूण व चारा पिकांचेही नुकसान होणार आहे. सोसाट्याचा वारा व अवकाळी पाऊस झाल्यास आंब्यासह इतर फळबागांना देखील फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काढलेला कांदा वखारीत टाकण्यासाठी तसेच गहू सोंगणीसाठी शेतकर्‍यांची लगबग सुरू झाली आहे.

लाल कांद्यास पाच ते सहा हजार रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे शेतकर्‍यांना भाव मिळाला होता. त्यामुळे तालुक्यात गावरान कांद्याची लागवडही मोठ्या प्रमाणात झाली आहे. जेऊर पट्टा वगळता तालुक्यात इतर सर्वत्र कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येते.

जेऊर पट्टा कांद्यासाठी प्रसिद्ध असला, तरी चालू वर्षी पाण्याअभावी गावरान कांद्याचे क्षेत्र घटल्याचे दिसून येते. कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यांनी विक्रमी कांद्याचे उत्पादन झाल्याने गावरान कांद्याचे दर कोसळले असून, दीड हजार रुपये प्रति क्वटल असा सरासरी भाव मिळत आहे. नगर तालुका कांद्याचे पठार म्हणून ओळख निर्माण करत आहे. लाल, रांगडा, गावरान कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येत असते. तालुक्यातील शेतकर्‍यांचे संपूर्ण आर्थिक गणित कांद्याच्या उत्पादनावरच ठरलेले आहे.

काढणीला असणार्‍या कांद्याला अवकाळीचा मोठा फटका बसू शकतो. अवकाळी पावसाचे पाणी कांद्याच्या गाभ्यामध्ये गेल्यास कांदा सडणार आहे. तसेच भिजलेला कांदा वखारीमध्येही टिकणार नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना कवडीमोल भावाने कांदा विकण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

चार दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाल्याने पालेभाज्यांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. चारा पिकांवरही किडीचा प्रादुर्भाव झाला आहे.

सुमारे तीन एकर गावरान कांदा काढणीला आहे. कांद्याचे रोप, शेतीची मशागत, खुरपणी, औषधांची फवारणी, खते, मजुरी यासाठी सुमारे दोन लाख रुपये खर्च झाला आहे. आजच्या बाजारभावात झालेला खर्चही वसूल होणार नाही.

सुधीर पवार, शेतकरी, जेऊर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news