

राहुरी : तालुक्यातील तमनर आखाडा येथील प्रसिद्ध वारकरी व सेवाभावी व्यक्तिमत्त्व असलेले सुखदेव बाजीराव तमनर (वय 64) यांचे पंढरपूरच्या वारीदरम्यान 1 जुलै रोजी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
सुखदेव तमनर हे गेल्या अनेक वर्षांपासून वारकरी संप्रदायाशी निष्ठेने व प्रेमाने जोडले गेले होते. विठ्ठलनामाच्या भक्तीत त्यांनी आपले आयुष्य अर्पण केले होते. दर वर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी संपूर्ण तयारीनिशी पंढरपूर वारीसाठी दिंडीत सहभाग घेतला होता. मात्र वारीदरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी गावात पोहोचताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली.
सुखदेव तमनर यांच्यामागे दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. श्रीकांत तमनर व भारत तमनर हे त्यांचे पुत्र असून, ह.भ.प. दत्तात्रय महाराज तमनर (पेंटर) यांचे ते चुलते होत. तसेच महाराष्ट्र पोलिस दलातील रामदास नारायण तमनर आणि युवा उद्योजक व माजी उपसरपंच आप्पासाहेब नारायण तमनर यांचेही ते चुलते होत. सुखदेव तमनर यांच्या पार्थिवावर आखाडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. भावपूर्ण शब्दांत गावकर्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.