श्रीगोंद्यातून विक्रमसिंहच उमेदवार पाहिजे; कार्यकर्त्यांचा सूर
श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघातून आ. बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर झाली असली, तरी आम्हाला विक्रमसिंह पाचपुते हेच उमेदवार पाहिजेत, असा सूर कार्यकर्त्यांमधून निघत आहे.
आ. पाचपुते यांच्या प्रकृतीमुळे यावेळेस त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यांच्याऐवजी पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी भाजपने जाहीर केली. त्यानुसार उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. मात्र, भाजपचे युवा नेते विक्रमसिंह पाचपुते यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे.
दरम्यान, आज माऊली संपर्क कार्यालयात प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आ. बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली. या बैठकीत कार्यकर्त्यांमधून विक्रमसिंह पाचपुतेच उमेदवार पाहिजेत, असा सूर निघाला आहे. आ. बबनराव पाचपुते हाच आमचा पक्ष व दादा सांगतील तो उमेदवार आम्ही निवडून आणणार, असे कार्यकर्त्यांनी ठामपणे सांगितले. आता विक्रमसिंह पाचपुते यांची उमेदवारी राहणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, आ. पाचपुते यांनी कार्यकर्त्यांच्या भावना पक्षाच्या वरिष्ठांना कळवू व निर्णय घेऊ, असे सांगितले.
या वेळी पोपट खेतमाळीस, गणपत काकडे, माऊली हिरवे, मारुती औटी, सुभाष नामदेव, संतोष भापकर, नानासाहेब कोथंबिरे, पुरुषोत्तम लगड आदींनी भाषणादरम्यान विक्रमसिंह यांचीच उमेदवारी द्या, अशी आग्रही मागणी केली. प्रास्ताविकात तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी प्रतिभा पाचपुते यांच्या उमेदवारीबाबत सविस्तर भावना व्यक्त केल्या.
विक्रमसिंह यांची उमेदवारी सक्षम ठरणार
युवा नेते विक्रमसिंह पाचपुते यांना तरुण वर्गाचा प्रतिसाद चांगलाच वाढला आहे. आ. पाचपुते यांच्या आजारपणामुळे तालुक्यातील विकासकामांसाठी मंत्रालयात जाऊन निधी मिळवण्याची हातोटी विक्रमसिंह यांच्याकडे आहे, तसेच जुन्या-नव्याची सांगड घालण्यात विक्रमसिंह यांना चांगलाच अनुभव आहे. या सर्व बाबींमुळे विक्रमसिंह यांची उमेदवारी सक्षम ठरणार आहे.

