कर्जत-जामखेड मतदारसंघात बारामती अॅग्रो कारखान्याच्या शेतकी अधिकार्यास नान्नज (ता. जामखेड) येथे सरपंच व त्यांच्या सहकार्यांनी पैशांसह पकडले. पकडलेले अधिकारी ज्या कारखान्याचे आहेत, तो कारखाना आमदार रोहित पवार यांच्या अधिपत्याखाली सुरू आहे. दरम्यान, भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे यांनीही ‘लक्ष्मीदर्शना’वरून रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
‘बारामती अॅग्रो युनिट क्रमांक 3’ या साखर कारखान्याचे शेतकी अधिकारी मधुकर मारुती मोहिते यांना नान्नज (ता. जामखेड) येथे पैशांसह पकडल्याचा दावा ग्रामस्थांनी सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या व्हिडिओत केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये असलेल्या नान्नज या गावामध्ये श्री. मोहिते यांना त्यांच्या जीपसह (एमएस 16 एटी 6426) पकडले. त्या वेळी त्यांच्याकडे रोख रक्कम, तसेच काही कागद सापडले असून, त्यावर काही नावे व त्यासमोर आकड्यांच्या नोंदी होत्या, अशी माहिती ग्रामस्थ महेंद्र मोहोळकर यांनी दिली.
या घटनेनंतर ग्रामस्थांनी 112 या क्रमांकावर फोन करून पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिस गावात पोहोचले. ग्रामस्थांनी मोहिते यास पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, या प्रकरणी पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्याकडे विचारणा केल्या असता, त्यांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले असून, चौकशी सुरू आहे असे सांगितले.
दरम्यान, या घटनेने कर्जत-जामखेडमध्ये खळबळ उडाली असून मोहिते यांना पैशासह पकडल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता पोलिसांकडून अधिक चौकशी सुरु आहे.
जामखेड तालुक्यातील नान्नज येथे बारामती अॅग्रो या कंपनीचा अधिकारी मोहिते हा मतदारांना पैसे वाटत असताना ग्रामस्थांनी पकडला. त्याच्याकडून यादीदेखील हस्तगत करण्यात आली आहे. अशा घटना घडू नये यासाठी मी प्रशासनाला कळवले होते. मात्र त्यांच्या हलगर्जीपणामुळे हे घडले आहे.
आमदार प्रा. राम शिंदे
भाजपने जे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, तो पूर्णपणे बनाव आहे. ती व्यक्ती माझ्या कारखान्याची शेतकी अधिकारी आहे. कारखाना सुरू असून ऊसतोडणी मुकादमांसह वाहने व ऊसतोडणी नियोजनासाठी पैसे देणे सुरू आहे. मात्र त्यांना जाणीवपूर्वक दबावाखाली आणत मारहाण केली. बळजबरीने कागद लिहून घेऊन हा बनाव रचला.
आमदार रोहित पवार