Sangamner News: तालुक्यातील धांदरफळ येथे खासदार सुजय विखे यांच्या सभेत डॉ. जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अटक केलेल्या वसंतराव देशमुख यांना सोमवारी (दि. 28) न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली.
धांदरफळ येथील सभेत आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल तालुका पोलिसात देशमुख यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच देशमुख फरार झाले होते. त्यांना शोधण्यासाठी पथक रवाना करण्यात आले. यामुळे संगमनेर तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. देशमुख यांना अटक करावी या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
यानंतर देशमुख यांना रविवारी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. त्यांची रात्री वैद्यकीय तपासणी करण्यात आली. रक्तदाब वाढल्याने उपचारासाठी देशमुख यांना नाशिक येथील रुग्णालयात पाठविण्याची सूचना वैद्यकीय अधिकार्यांनी केली. यानंतर रात्री त्यांना नाशिक येथे हलविण्यात आले. सोमवारी सकाळी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केल्याची माहिती संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास ढुमने यांनी दिली.