

अकोले: देवगाव येथे आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याचे विटंबना झाल्याच्या प्रकरणी क्रॉन्ट्रॅक्टर अजित बाळु नवले (रा. पाडळणे) आणि शैलेंद्र गणपत पांडे (रा. अकोले) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा राजूर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा नोंदवण्यात आला.
तक्रारदार पोपट काकु चौधरी (वय ४१, रा. धामनवण) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे हे महाराष्ट्रातील आदिवासी महादेव कोळी समाजाचे तसेच सर्व आदिवासी नागरिकांचे आराध्य दैवत आहेत. देवगावातील पुतळा हा त्यांच्या दर्शना आणि पूजा करण्यासाठी असलेला महत्त्वाचा ठिकाण असून, त्या ठिकाणी शुभोभीकरणाचे काम ठेकेदारांनी सुरू केले होते.
तक्रारदार दर्शनासाठी गेल्यावर पुतळा त्या ठिकाणी दिसला नाही. कामगारांकडून विचारपूस केल्यावर त्यांना कळाले की, ठेकेदारांनी पुतळा परवानगीशिवाय सभागृहात हलविला होता. पी.डब्ल्यू.डी कार्यालयाकडूनही पुष्टी झाली की, पुतळा हलवण्याची कोणतीही परवानगी देण्यात आलेली नव्हती.
त्यानंतर, ठेकेदारांवर आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याचे अवमान, विटंबना करण्याच्या उद्देशाने मुळ ठिकाणावरून पुतळा हलवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजूर पोलिसांचे स.पो.नि. दीपक सरोदे या प्रकरणाची तपासणी करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच अमित भांगरे, दिलीप भांगरे, बाजीराव सगभोर, अनंत गाणे, तुळसाबाई भांगरे, स्वप्निल धांडे, पंढरीनाथ खाडे, पोपट चौधरी आणि जितेंद्र भांगरे यांनी देवगावात जाऊन निषेध व्यक्त केला. राजूर पोलिस ठाण्यात जमलेल्या आदिवासी नागरिकांनी संबंधित ठेकेदारांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. पोलीस निरीक्षकांनी जमाव शांत करून गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर वातावरण स्थिर झाले.