

वांबोरी: तरुण शेतकर्याने आजारपणाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन, जीवन यात्रा संपविल्याची हृदय पिळवटणारी घटना वांबोरी - पांढरीपूल रोडवरील पुलवाडी येथे घडली. संपत चंद्रकांत ढोके (45 रा, पुलवाडी, ता. राहुरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गुरुवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराची माहिती वैद्यकीय अधिकार्यांनी वांबोरी पोलिस दुरक्षेत्रात दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. (Latest Ahilyanagar News)
याबाबत पोलिस सूत्रांनी सांगितले की, मृत संपत ढोके हे पत्नी, दोन मुले व वडिलांसह राहत होते. हमाली व मिळेल ते रोजंदारीचे काम करुन, ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीने साथ न दिल्यामुळे ते सतत आजारी होते. सततचे आजारपण, अशातच कुटुंबाची आर्थिक जबाबदारी यामुळे हतबल झालेल्या संपत या तरुणाने जीवन संपविण्याचा निर्धार केला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे.
सकाळी 8 वाजेच्या सुमारास पत्नी किराणा सामान आणण्यासाठी घराबाहेर गेली असता, संपत याने, विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. विहिरीत भरपूर पाणी असल्यामुळे मृतदेहाचा शोध घेणे कठीण झाले होते. तब्बल 3 तास गळ टाकून, पोहणार्या तरुणांच्या मदतीने विहिरीत शोध घेत संपत यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.
मृतदेह वांबोरी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. वैद्यकीय अधिकार्यांनी संपत याला मृत घोषित करून, पार्थिव कुटुंबियांना दिले. उत्तरीय तपासणीनंतर शोकाकूल वातावरणात वांबोरी येथील वाल्मीक तीर्थ येथे संपत याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय राठोड, पोलिस कॉन्स्टेबल अशोक झिने व पोलिस नाईक सुनील निकम करीत आहेत.