

शशिकांत पवार
नगर तालुका: अहिल्यानगर तालुक्यातील शेतकर्यांसमोर खरीप पिकांबाबत मोठे संकट उभे ठाकले आहे. पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने खरीप पिके कोमेजण्यास सुरुवात झाली असून, बळिराजासमोर संकटांचे ‘मळभ’ उभे राहिले आहे. खरीप पिकांचे भवितव्य धोक्यात आले असून, शेतकर्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.
तालुक्यातील दक्षिण पट्ट्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. मान्सूनपूर्व पावसाच्या ओलीवरच बहुतांशी शेतकर्यांनी खरिपाच्या पेरण्या उरकून घेतल्या होत्या. वाळकी, अकोळनेर, खडकी, खंडाळा, सारोळा कासार या पट्ट्यात मान्सूनपूर्व पावसाने बंधारे, नाले, तलाव तुडुंब भरले होते. परंतु जेऊर, चिचोंडी पाटील, हिंगणगाव, जखणगाव, विळद, देहरे पट्ट्यात मात्र पावसाने हुलकावणी दिली. मान्सूनपूर्व पाऊसही नाममात्र झाला होता. (Latest Ahilyanagar News)
जूनच्या पहिल्या आठवड्यात तालुक्यात झालेल्या सर्वदूर पावसाने शेतकर्यांनी खरिपाच्या पेरण्या उरकून घेतल्या. मृग, तसेच आर्द्रा नक्षत्रात पावसाच्या सरी चांगल्या बरसतील, या अपेक्षेवर बळिराजानी मूग, सोयाबीन, बाजरी, तूर, उडीद, वाटाणा या खरीप पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात केली. परंतु पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांवर संक्रांत आली आहे. अनेक भागातील पिके कोमेजण्यास सुरुवात झाली आहे. पेरणीनंतर पावसाने पाठ फिरवल्याने उगवून आलेल्या पिकांवर मोठे संकट ओढवले आहे. पाऊस लांबणीवर गेल्याने बळिराजाची चिंता वाढली आहे.
विविध भागात पिके कोमेजून जाण्यास सुरुवात झाली आहे. पेरणी केलेल्या खरीप पिकांना पावसाची नितांत गरज आहे. दुबार पेरणीची ही वेळ निघून गेलेली आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
vकाही भागात पाणी उपलब्ध असूनही खरीप पिकांना पाणी देता येत नसल्याने बळिराजासमोर अडचण निर्माण झाली आहे. अनेक भागात पाण्याची पातळीच वाढली नाही. काही शेतकर्यांनी तुषार सिंचनाच्या आधारे पिके वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे.
मान्सूनपूर्व, तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसावर सुमारे 70 हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. परंतु जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाने दडी मारल्याने बळिराजासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. खरीप पिकांचे भवितव्य धोक्यात आले असून, शेतकरी राजा चिंतेत आहे. शेतीची मशागत, पेरणी, बियाणे यावर शेतकर्यांनी मोठा खर्च केला आहे. परंतु पावसाने दडी मारल्याने बळिराजाच्या स्वप्नांची राखरांगोळी होणार असल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे.
मूग व सोयाबीन पिकांची पेरणी करण्यात आली आहे. शेतीची मशागत, बियाणे यावर मोठा खर्च झाला आहे. परंतु पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने पिके कोमेजण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले ठाकले आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडणार आहे.
-बाळासाहेब नरवडे, प्रगतिशील शेतकरी, टाकळी खातगाव)
खरीप पिकांच्या पेरण्या करण्यात आल्या आहेत. परिसरात पावसाचे प्रमाण फारच कमी राहिले आहे. पिके उगवून आल्यानंतर पावसाची नितांत गरज आहे. पिके कोमेजण्यास सुरुवात झाली आहे. खरीप पिकांच्या उत्पन्नाची शाश्वती राहिली नाही. पावसाची प्रतीक्षा आहे.
-हेमंत शेटे, शेतकरी, जेऊर
मूग, सोयाबीनसारखी पिके काही भागात हिरवीगार दिसत असली, तरी पाण्याचा ताण पडल्याने बहार योग्य प्रमाणात येणार नाही. शेंगांचे प्रमाण कमी राहणार आहे. त्यामुळे अशा ठिकाणीही उत्पन्नात फटका बसणार आहे.
- संदीप काळे, कृषितज्ज्ञ