

नगर: मे महिन्यात झालेल्या दमदार पावसाने जिल्ह्यातील धरणांत 1 हजार 978 दलघफू पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी धरणांत 17 हजार 127 इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सव्वाआठ टीएमसी अधिकचा साठा आहे. उन्हाळ्यात सीना धरण पहिल्यांदाच 78 टक्के भरले आहे.
मे महिन्यात पहिल्यांदाच जिल्हाभर दमदार पाऊस झाला. सरासरी 220 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे नदी, नाले, ओढे वाहिले गेले. त्यामुळे गावागावांतील छोटे छोटे तलाव देखील भरले गेले आहेत. 18 ते 29 मे या दहा दिवसांत सलग जोरदार पाऊस झाला. त्यामुळे धरणांतदेखील मोठी आवक झाली आहे. (Latest Ahilyanagar News)
21 मे 2025 रोजी जिल्ह्यातील नऊ धरणांत 15 हजार 396 दलघफू इतका पाणीसाठा होता. या दहा दिवसांत धरणांत जवळपास 1 हजार 978 दलघफू इतक्या पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे 30 मे रोजी धरणांत एकूण 17 हजार 127 दलघफू इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.
30 मे रोजी सकाळी 6 वाजता मुळा धरणात 8 हजार 892, भंडारदरा धरणात 2 हजार 882, निळवंडे धरणात 2 हजार 311, आढळा धरणात 535, मांडओहळमध्ये 135 तर सीना धरणात 1 हजार 857 दलघफू इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास सव्वाआठ टीएमसी पाणीसाठा अधिकचा आहे.
जिल्ह्यातील 124 टँकर बंद
मे महिन्यात झालेल्या पावसाने जिल्ह्यातील 124 टँकर बंद झाले आहेत. त्यामुळे सध्या 57 टँकर धावत आहेत. यामध्ये सर्वाधिक पाथर्डी तालुक्यातील 18 टँकरचा समावेश आहे. 25 मे रोजी जिल्ह्यात 181 टँकर धावत होते. परंतु 7 मेनंतर पावसास प्रारंभ झाला. जवळपास तीन आठवडे कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरु होता.
या पावसामुळे ओढे, नाले वाहिले गेले. त्यामुळे भूजलपातळीत वाढ होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे 124 टँकर जिल्हा प्रशासनाला बंद करावे लागले आहेत. सध्या संगमनेर तालुक्यात 17, पाथर्डी तालुक्यात 18, शेवगावमध्ये 9, नगर तालुक्यात 8, पारनेर तालुक्यात 3 तर नेवासा तालुक्यात 2 टँकर धावत आहेत. गेल्या वर्षी 25 मे रोजी जिल्ह्यात 331 टँकर धावत होते.
धरणांतील आवक
मुळा : 475
भंडारदरा : 344
सीना : 977
निळवंडे : 83
मांडओहळ : 61
आढळा : 38
(दशलक्ष घनफूट)