

Ahilyanagar News: महापालिकेच्या मार्केट विभागातील कर्मचार्यांची पैसे देवाण-घेवाणसंदर्भात कथित ऑडिओ क्लिप प्रसारित झाल्यानंतर आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी त्या दोन कर्मचार्यांना निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित केली आहे.
लिपिक अमित पालवे व शिपाई उमेश शेंदुरकर (मार्केट विभाग) असे त्या कर्मचार्यांची नावे आहेत. शहरातील रस्त्यांवर विक्री व्यवसाय करणार्या विक्रेत्यांकडून महापालिका दररोज रस्ता बाजू शुल्क वसुली करते. यापूर्वी ठेकेदाराकडून वसुली केली जात होती.
मात्र, ठेकेदार नियुक्त न झाल्याने मार्केट विभागातील कर्मचारी रोज ही वसुली करतात. त्यासाठी 15 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या कर्मचार्यांकडून विभाग प्रमुखांना हप्ता दिला जात असल्याचे दोन कर्मचार्यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रसारित झाली आहे.
दोन कर्मचारी संभाषण करताना साहेबाला रोज दोनशे ते पाचशे रूपये देत असल्याचा उल्लेख केला गेला आहे. या ध्वनिफितीची मनपा आयुक्त तथा प्रशासक डांगे यांनी गंभीर दखल घेत उपायुक्त प्रियंका शिंदे यांना चौकशी करून 24 तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
या चौकशी अहवालात शिपाई शेंदूरकर यांनी मार्केट विभागातील कामकाजाच्या संभाषणाचे ध्वनिफित तयार करून ती व्हायरल केल्याचे नमूद केले. या प्रकरणात लिपिक पालवे यांनी देखील शेंदूरकर यांना साथ दिल्याचे नमूद करण्यात आले आहे.
शेंदूरकर यांनी मद्यप्राशन करून तसेच पालवे यांनीही गैरवर्तन केल्याने महापालिका अधिनियमानुसार वरील दोन्ही कर्मचार्यांचे निलंबन करण्यात आले असून, त्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. तसा आदेश आयुक्त यशवंत डांगे यांनी काढला आहे.