विवाहितेचा छळ करून खून, पाच आरोपींना जन्मठेप

प्रधान जिल्हा न्यायाधीशांचा निकाल; शेवगाव येथील घटना
woman harassment Case
प्रातिनिधिक छायाचित्र. File Photo
Published on
Updated on

विवाहितेने माहेरून पैसे आणावेत यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ करून खून केल्याच्या गुन्ह्यात प्रधान जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे यांनी पाच आरोपींना दोषी धरले. विविध कलमान्वये पाचही आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी सहा हजारांच्या दंडाची शिक्षा केली.

मुजक्कीर रियाजुद्दीन शेख (वय 33), फरजाना उर्फ सायराबानू रियाजुद्दीन शेख (वय 54), रियाजुद्दीन हाशमुद्दीन शेख, असीम रियाजुद्दीन शेख (वय 31), अलमास उर्फ सुमय्या रियाजुद्दीन शेख (वय 27 सर्व रा. आखेगाव रोड शेवगाव ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) अशी आरोपींची नावे आहेत.

अधिक माहिती अशी, फिर्यादी गियासुदीन जमालुद्दिन शेख (वय 50) यांनी 20 फेब्रुवारी 2020 रोजी शेवगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यात त्यांची मुलगी अफरीन हिचे लग्न 28 जानेवारी 2016 रोजी आरोपी मुजक्कीर रियाजुद्दीन शेख याच्यासोबत पैठण येथे झाले. त्यांच्या लग्नानंतर मुलगी सासरी नांदण्यास गेली.

मुलीला वरील आरोपींनी सहा महिने चांगले नांदविले. त्यानंतर वरील सर्व आरोपींनी मोबाईल दुकान टाकण्यासाठी माहेरून 50 हजार घेऊन येण्यास अफरीन हिला सांगितले. पैसे दिले नाहीतर मला त्रास देतील असे मयत ही फिर्यादींना सांगत असे त्यामुळे फिर्यादी यांनी मुलीला त्रास होऊ नये म्हणून 50 हजार दिले.

त्यानंतर आरोपींनी अफरिन हिला तीन ते चार महिने चांगले नांदविले. मात्र, त्यानंतर आरोपी अफरिन हिला पुन्हा त्रास देऊ लागले. तिला माहेरी आणून सोडले. त्यानंतर लोकांकडून घेतलेले उसणे पैसे देण्यासाठी 80 हजार रुपये द्या. त्यानंतर तिला नांदण्यास घेऊन जातो. पैसे दिले नाही तर नांदण्यास नेणार नाही. त्यानंतर आरोपींना पुन्हा 80 हजार रुपये दिले.

चार महिने चांगले नांदविल्यानंतर तिला पुन्हा त्रास देण्यास सुरूवात केली. भेटण्यास गेल्यानंतर अफरिन घरातील लोक माहेरून पैसे आणण्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याचे सांगत होती. त्यानंतर 19 जानेवारी 2020 रोजी फिर्यादी यांना फोन आला की, त्यांचे मुलीला सरकारी दवाखाना शेवगाव येथे अ‍ॅडमिट केलेले आहे.

तिला भेटण्यासाठी दवाखान्यात गेले असता ती मयत झालेली होती. तिच्या अंगावर जखमा होत्या. शेवगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर तपासानुसार हुंडाबळी व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे यांनी गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.

या खटल्यात सरकारी पक्षातर्फे एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले. तर, आरोपीतर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाचा युक्तिवाद व पुरावा ग्राह्यधरून न्यायालयाने आरोपीला विविध कलमान्वये जन्मठेपेची शिक्षा केली.

सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता अर्जुन बाळासाहेब पवार यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक एम. ए. जोशी, पोलिस हेड कॉन्स्टेबल अशोक एन. बेळगे यांनी सरकारी वकील यांना सहाय्य केले.

शवविच्छेदन अहवालात खून केल्याचे स्पष्ट

अकस्मात मृत्यूची नोंद केल्यानंतर पोलिस तपासात अनेकबाबी उघडकीस आल्या मयताच्या शवविच्छेदन अहवालामध्ये अंगावर जखमा दिसून आल्या.त्यामुळे मारहाण करुन खुन केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news