डॉ. सूर्यकांत वरकड
कै. बलभिमआण्णा जगताप क्रीडा नगरी अहिल्यानगर येथे राज्य कुस्तीगीर संघ व जिल्हा कुस्तीगीर संघातर्फे आयोजित महाराष्ट्र केसरीच्या गादी व माती गटातील उपांत्यपूर्व व उपांत्य लढती झाल्या. त्यात गादी गटातून डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ तर, माती गटातून सोलापूरचा महेंद्र गायकवाड, परभणीचा साकेत यादवने अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे दोन्ही गटाचा अंतिम सामना झाल्यानंतर महाराष्ट्र केसरीची लढत होणार आहे. त्यामुळे चौघेही आता महाराष्ट्र केसरीचे दावेदार मानले जात आहेत.
उपांत्यपूर्व सामन्यात सोलापूरचा उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड याने सांगलीचा संदीप मोठेवर मात केली. उंचपुर्या आणि धिप्पाड शरीरयष्टीचे गोदान लाभलेल्या महेंद्र गायकवाड समोर संदीप मोठेचे डाव प्रतिडाव अपुरे पडले. महेंद्र गायकवाडने त्याचा 8 -0 असा पराभव केला.
दुसरी लढत सोलापूर शहर व सोलापूर शहरचा वेताळ शेळके व सोलापूर तालिमचे प्रतिनिधित्व करणार्या विशाल बनकर यांच्या अत्यंत चुरशीची लढत झाली. चित्तथरारक लढतीत गुणांचे पारडे शेवटपर्यंत फिरते राहिले. पहिल्या फेरीत शेळकेने ऐकरी पट करून दोन गुण मिळविले. विशालच्या निष्कियेतेचाही एक गुण त्याला मिळाला. दुसर्या फेरीत विशाल आक्रमक झाला.
त्याने दुहेरीपट करीत दोन गुण मिळविले. पुन्हा एकेरीपट करून दोन मिळविले. त्यामुळे लढत चुरशीची झाली. शेवटच्या 40 सेकंदात विशालने पुन्हा एकेरी पट करून दोन व धोकादाय स्थिती नेत दोन गुण मिळविले अशी 8-5 अशी भक्कम आघाडी घेत विजय मिळविला. परभणीच्या साकेत यादव याने भंडार्याच्या विक्रमसिंह भोसले याचा 11-0, तर गोंदियाच्या सुहास गोडगे याने पुण्याच्या आकाश रानवडेचा 5-0 अशा तांत्रिक गुणांच्या आधारे परावभ करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
उपांत्य फेरीत सोलापूरचेच महेंद्र गायकवाड व विशाल बनकर एकमेकांना भिडले. धिप्पाड शरीर व शांत कुस्ती खेळणारा महेंद्र गायकवाड आक्रमक झालेला दिसला. तर, प्रचंड चपळाई असलेल्या विशाल बनकरचा महेंद्र पुढे निभाव लागला नाही. महेंद्रने हप्ताडाव टाकण्याचा प्रयत्न केला मात्र, तो विशालने परतवून लावला. महेंद्रच्या बलदंड ताकदीपुढे विशालची आक्रमता फेल ठरली. महेंद्र गायकवाडने ही लढत 4-1 अशा गुणांनी जिंकली.
परभणीच्या साकेत यादव व गोंदियाच्या सुहास गोडगे यांच्या झालेल्या लढतीत साकेतने 8-2 अशा गुणाधिक्यांनी पराभव करत मातीच्या अंतिम फेरीत प्रवेश. त्याची अंतिम लढत सोलापूरच्या महेंद्र गायकवाड यांच्याशी होणार आहे.
गादी विभागाच्या उपांत्यपूर्व फेरीत मुंबईच्या सतपाल शिंदे याने गोंदियाच्या सतिश मुंडे याचा 6-4 असा परभाव केला. तर, पुण्याचा युवा मल्ल पृथ्वीराज मोहोळ याने नंदूबारच्या धनाजी कोळी याला पराभवाची धूळ चारली. त्याने सुरूवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत एकेरी पट काढून दोन तर, मोळीडावावर चार तर खेमी डावावर ताबा घेत पहिल्या फेरीत 9 गुण घेतले.
दुसर्या फेरीत पृथ्वीराज मोहोळ याने 11-0 अशी लढत जिंकत फायनलमध्ये प्रवेश केला. अहिल्यानगरच्या चेतन रेपाळे याने सोलापूरच्या सागर खरातचा 3-1 पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुसरी डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे व अहिल्यानगरच्या सुदर्शन कोतकर यांच्यात लढत झाली.
सुदर्शन कोतकरने सुरूवातीलाच आक्रमक पवित्रा घेत एकेरी पट काढण्याचा प्रयत्न केला. तो परतून लावत शिवराजनेच एक गुण मिळविला. शिवराजने पुन्हा एकेरी पट काढून 2 घेतले. मात्र, त्यात सुदर्शन कोतकरच्या पायाला दुखापत झाल्याने तो मैदाना बाहेर पडला. त्यात शिवराज राक्षेला वियजी घोषीत करण्यात आले.
उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीत पृथ्वीराज मोहोळ याने मुंबईच्या सतपाल शिंदे याचा 11-0 असा पराभव केला. तर, नांदेडच्या शिवराज राक्षे याने उपांत्य फेरीची लढत अवघ्या एका मिनिटांत संपविली.
भारंदाज डावावर अहिल्यानगरच्या चेतन रेपाळे याचा 10-0 असा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम लढत पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ व शिवराज राक्षे यांच्यात होणार आहे.दरम्यान, अहिल्यानगरच्या सुदर्शन कोतकर याच्या पायाला दुखापत झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याचे समजते.
नगरच्या कोतकर व रेपाळेचा पराभव
महाराष्ट्र केसरी गादी विभागामध्ये उपांत्य फेरीपर्यंत अहिल्यानगरच्या सुदर्शन कोतकर व चेतन रेपाळे यांनी धडक मारली होती. त्यामुळे अहिल्यानगरच्या कुस्ती शौकिनांना मोठ्या आशा लागल्या होत्या. मात्र, उपांत्य सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. सर्वांच्या आशेवर पाणी फिरले.