सीएट कंपनीचे मालट्रकचे टायर हलोल(गुजरात) येथून तामिळनाडूला विक्रीसाठी नेले जात असताना चालकाने धुळे व अहिल्यानगरमध्ये टायरची परस्पर विक्री केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने धुळे शहरातून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन लाख 52 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
इरशाद निशार अहमद (वय 55, रा. रामपूर कुमियान, पो.तलालपट्टी, प्रतापगड, उत्तरप्रदेश), अब्दुल कय्युम अब्दुल वहाब शहा (वय 24, रा. जिन मैदानजवळ, चाळीसगाव रोड, धुळे) यांना अटक केली. तर, जावेद उर्फ जोसेफ शेख (रा. राणीगंज, जि. प्रतापगड, उत्तरप्रदेश), अन्सार (पूर्ण नाव माहित नाही) फरार आहेत.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मोहमंद मुस्ताफा (रा. मेन रोड, श्रीवाचुर, पेरंबलोर, तामिळनाडू यांनी 27 डिसेंबर 2024 रोजी परकोट मारिटिमा एजन्सी, तामीळनाडू या कंपनीच्या मार्फत कंटेनर क्रमांकद्वारे सीएट कंपनीचे टायर हलोल (गुजरात) येथून होसूर तामीळनाडू येथे मागविलेले होते. कंटेनरवरील ड्रायव्हर याने सीएट कंपनीचे टायरची परस्पर विक्री करून विल्हेवाट लावली. तो रिकामा कंटेनर जातेगाव शिवार (ता. पारनेर) येथे उभा केला. याबाबत मोहमंद मुस्ताफा यांच्या फिर्यादीवरून सुपा पोलिस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना वरील गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले. त्यानुसार आहेर यांनी उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलिस अंमलदार बापूसाहेब फोलाणे, मनोहर गोसावी, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, सागर ससाणे, महादेव भांड यांचे पथक तयार करून गुन्ह्यातील आरोपींच्या शोधाकामी रवाना केले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपी इरशाद अहमद हा धुळे येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने रविवारी (दि.19) धुळे येथून इरशाद अहमद ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता ट्रकमधून टायर तामिळनाडू येथे घेऊन जात असताना जावेद शेख, जावेदचा मित्र अन्सार यांच्या मदतीने धुळे येथे अब्दुल शहा यास 82 टायर विकले. ट्रकमधील उर्वरित टायर्स अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये विक्री केल्याचे सांगितले.
दरम्यान, पोलिस पथकाने अब्दुल शहा याचा शोध घेऊन ताब्यात घेतले. चौकशीमध्ये त्याने रस्त्याने जाणार्या ट्रक चालकांना टायर विकले. तर, उर्वरित टायर्स अनिस हयात खान, (रा. रमाबाई आंबेडकरनगर, देवपूर, धुळे) याच्या दुकानाच्या मोकळ्या जागेत ठेवल्याचे सांगितले. पोलिस पथकाने धुळे येथून अनिस खान याच्या दुकानासमोरून 2 लाख 52 हजारांचे 12 टायर जप्त केले. ताब्यात घेलेल्या दोन्ही संशयित आरोपींना सुपा पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. पोलिस तपास सुपा पोलिस करीत आहेत.
हलोल(गुजरात) येथून तामिळनाडूला विक्रीसाठी नेले जाणार्या टायरची चालकाने धुळे व नगरमध्ये परस्पर विक्री केली. त्यात पोलिसांनी धुळ्यातून दोघांना ताब्यात घेतले. आता नगरमध्ये कोणाला टायरची विक्री केली, याचा शोध पोलिस घेत आहेत.