

ढवळगाव : श्रीगोंदा तालुक्यामध्ये गुरुवारी (दि. 3) सायंकाळी वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. वादळी वार्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळली. अवकाळी पावसान श्रीगोंदा तालुक्यातील माठ येथील वीटभट्टयांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. विटांसाठी लागणारा कच्चामाल देखील या पावसामुळे पाण्यात गेला आहे.
राजापूर, हिंगणी, देवदैठण परिसरातील केळी, आंब्यासह इतर फळबागांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. देवदैठण, ढवळगाव, अरणगाव, कोंडेगव्हाण, पिंप्री कोलंदर, म्हसे, वडगाव, गव्हाणवाडी, माठ, हिंगणी, येवतीसह परिसरात गारपिटीसह झालेल्या वादळी पावसामुळे केळी, आंबा, द्राक्ष, डाळिंब, कांदा, मका, गहू, कडवळ, हरभरा इत्यादी पिकांना देखील मोठा फटका बसला आहे.
हिंगणी, अरणगाव, देवदैठण, सावंतवाडी, कोल्हेवाडी परिसरात विजेच्या खांबावर झाडे पडल्याने वीज वाहक तारा तुटल्या होत्या. त्यामुळे काही तास वीजपुरवठा खंडित झाला होता. अचालक आलेल्या वादळी पावसान क्षणात सर्वत्र पाणीच पाणी झाले. त्यामुळे अनेकांची पळापळ झाली. अनेक शेतकर्यांचा कांदा सध्या शेतात काढून टाकण्यात आलेला आहे. हा कांदा झाकण्यासाठी शेतकर्यांची चांगलीच तारांबळ उडाली. वेळेवर कांदा न झाकल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. इतरही पिकांचे अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे.
अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे महसूल यंत्रणेने बांधावर जाऊन पंचनामे करावेत. तसेच नुकसानग्रस्तांना राज्य सरकारने भरपाई द्यावी, अशी मागणी राजापूर परिसरातील शेतकर्यांनी केली आहे.
अवकाळी पावसाच्या धारस्तीने प्लास्टिक आणि ताडपत्री कागदाला प्रचंड मागणी वाढली आहे. उन्हाळी कांदा काढण्यासाठी शेतकर्यांची सध्या लगबग सुरू आहे. अशा परिस्थितीत शेतकर्यांना प्लास्टिक कागद व ताडपत्री खरेदीसाठी जास्तीची रक्कम खर्च करावी लागत आहे. आधीच कांद्याचे घटलेले दर, वाढलेला उत्पादन खर्च, खतांचे गगनाला भिडलेले भाव, यामुळे शेतकरी मेटाकोटीला आला आहे.
गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसाने वीटउत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक व्यावसायिकांनी वीटउत्पादन केले होते. पावसाने त्यांची पुन्हा माती झाली आहे. नुकसानग्रस्तांना राज्य सरकारने आर्थिक मदत करण्याची गरज आहे. -
उमेश घेगडे, वीट उत्पादक, माठ