नगर जिल्ह्यात सासरे, जावई, व्याही, भाचेसून निवडणूक रिंगणात

सोयरेधायरेच आमने-सामने
Maharashtra Assembly Election 2024
सोयरेधायरेच निवडणुकीच्या रिंगणातFile Photo
Published on: 
Updated on: 

जिल्ह्यात सोयरेधायरे (सोधा) फॅक्टर मोठ्या प्रमाणात चालतो. याचा राज्यभर बोलबाला आहे. परंतु यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काही ठिकाणी सोयर्‍याधायर्‍यांमध्येच लढती रंगत आहेत. काँग्रेसचे स्टार प्रचारक बाळासाहेब थोरात व भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर स्वत:च्या पक्षांशी बाधिलकी जपण्यासाठी सोयर्‍याधायर्‍यांच्या विरोधात प्रचार करण्याची वेळही आली आहे.

वर्चस्वासाठी राजकारणात आणि लढाईच्या रणांगणात सर्वच क्षम्य असते. शेतीच्या छोट्या छोट्या तुकड्यांसाठी सख्खे भाऊ एकमेकांच्या जिवावर उठतात. ग्रामपंचायतीची सत्ता हाती घेण्यासाठी एकमेकांच्या विरोधात पॅनल तयार करून एकमेकांची जिरवतात. गेल्या काही महिन्यांपूर्वी कन्नड तालुक्यातील पिशोर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आईच्या पॅनेलविरोधात मुलानेच पॅनल उभे केले होते.

(स्व.) बाळासाहेब विखे पाटील यांनी 1990 मध्ये आपले मावसभाऊ अण्णासाहेब म्हस्के यांना उभे करून चुलतजावई असलेल्या एकनाथ घोगरे यांचा पराभव केला होता. गेल्या विधानसभेला बीड जिल्ह्यात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव सख्ख्या पुतण्यानेच केला. पंकजा मुंडे यांना चुलतभाऊ धनंजय मुंडे यांच्याकडून पराभूत व्हावे लागले.

राजकीय बस्तान टिकविण्यासाठी वा मिळविण्यासाठी नातेवाईक एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवीत आले आहेत. तोच प्रकार जिल्ह्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काही अंशी दिसत आहे.

बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे माजी आमदार आप्पासाहेब राजळे यांच्या सूनबाई मोनिका राजळे भाजपतर्फे शेवगावमधून लढत आहेत. राजळे यांचे नंदई शंकरराव गडाख शिवसेना (उबाठा) पक्षातर्फे नेवासा मतदारसंघातून उमेदवारी करीत आहेत. गडाख यांचे व्याही चंद्रशेखर घुले अपक्ष म्हणून मोनिका राजळे यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात माजी आमदार चंद्रभान घोगरे यांच्या सूनबाई प्रभावती घोगरे निवडणूक लढवत आहेत. बाळासाहेब विखे पाटील यांचे बंधू भाऊसाहेब विखे पाटील आणि चंद्रभान घोगरे एकमेकांचे व्याही आहेत. त्यामुळे शिर्डी मतदारसंघात सोयरेधायरेच आमनेसामने आले आहेत.

पाच वेळा विधानसभेत प्रवेश करणारे शिवाजी कर्डिले आता सहाव्यांदा भाजपतर्फे राहुरीतून विधानसभेत जाण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांचे जावई संग्राम जगताप हेदेखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तिसर्‍यांदा अहमदनगर शहरातून निवडणूक लढवीत आहेत.

चंद्रशेखर घुले यांचे जावई आशुतोष काळे कोपरगावातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने प्राजक्त तनपुरे राहुरीतून रणांगणात आहेत. चंद्रशेखर घुले यांचे बंधू माजी आमदार नरेंद्र घुले हे तनपुरे यांचे काका आहेत. त्यामुळे साहजिकच तनपुरे घराणे हे काळे, थोरात घराण्याचे नातेवाईक आहेत.

थोरात-विखे हेही नातेवाईकच

डॉ. सुजय विखे पाटील हे शंकरराव गडाख यांच्या भाच्याचे साडू आहेत. गडाख हे थोरातांचे भाचेजावई. बाळासाहेब विखे पाटील यांचे मावसभाऊ माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू यांच्या बंधूचे साडू आहेत. त्यामुळे संगमनेरचे थोरात आणि लोणीचे विखे हे एकमेकांचे सोयरे-धायरेच आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news