‘मढी’प्रकरणी तोडगा नाहीच!

दोन्ही समाजातील प्रमुखांची सोमवारी प्रशासनासमवेत बैठक
Pathardi News
‘मढी’प्रकरणी तोडगा नाहीच!Pudhari
Published on
Updated on

पाथर्डी - मढी यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसाय करू देऊ नये या मुद्यावर शनिवारी (दि. 8) प्रशासनाने बोलावलेल्या शांतता समितीच्या बैठकीत शेवटपर्यंत ठोस तोडगा निघाला नाही. याच विषयावर दोन्हीही समाजातील प्रमुख व्यक्तींची सोमवारी (दि. 10) प्रशासनासमवेत बैठक घेऊन तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

मढीची यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांची जबाबदारी असून, उपस्थित झालेले प्रश्न सर्वांनी समन्वयाच्या मार्गाने सोडवावे. त्यासाठी एकमेकांशी चर्चा करून योग्य मार्ग काढावा आणि यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी या वेळी केले.

बैठकीस अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, तहसीलदार उद्धव नाईक, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, संतोष खाडे, गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहायक पोलिस निरीक्षक हरीश भोये, पोलिस उपनिरीक्षक महादेव गुट्टे हे अधिकारी उपस्थित होते. शिवशंकर राजळे, रफिक शेख, नासीर शेख, बबन मरकड, सरपंच संजय मरकड, रवींद्र आरोळे, भगवान मरकड, भानुदास मरकड, शन्नो पठाण, सुनील पाखरे, भगवान बांगर, सोमनाथ अकोलकर, नानासाहेब पालवे, सचिन वायकर, डॉ. विलास मढीकर, श्यामराव मरकड, भाऊसाहेब मरकड, पोपट घोरपडे, गणेश मरकड, नागनाथ गर्जे, चंद्रभान पाखरे, फिरोज शेख, अन्सार शेख, मन्सूर पठाण, नाना बालवे, फिरोज शेख, जुबेर आतार, मढी देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पवार आदी उपस्थित होते.

बैठकीत मढी यात्रा शांततेत पार पाडावी अशी इच्छा असल्याचा सूर अनेकांनी आळवला, तर काहींनी वादग्रस्त विषय नेमके काय आहे यावर भाष्य केले. या वेळी मन्सूर पठाण म्हणाले की, आम्ही मढी येथे असलेल्या सर्व प्रथा पाळतो. देव एकच असून मार्ग वेगळे आहेत.

बालवे म्हणाले की, शांततेचा पुरस्कार आम्हीही करतो. मात्र, मुस्लिम बांधवांनी मढी येथील जमिनीबाबत वक्फ बोर्डाकडे जायला नको होते. हा दावा आधी काढून घ्या, तर अशोक पवार यांनी मढी येथील जमिनीचा वाद न्यायप्रविष्ट असल्याचे सांगितले.

रफिक शेख म्हणाले की, मुस्लिम समाजातर्फे काही चुकले असेल तर माफी मागतो. मात्र, ही यात्रा तालुक्याचे वैभव आहे. अनेक गोरगरीब व्यावसायिकांनी या यात्रेसाठी माल भरून ठेवला आहे. चुकीचा संदेश गेल्यास यात्रा प्रशासन आपल्या ताब्यात घेईल. त्यात कोणाचेही भले नाही. हिंदू-मुस्लिम असा भेद करत नाही. मी स्वतः ठाकरे गटाचा उपजिल्हाप्रमुख आहे. माझ्या पाच पिढ्या यात्रेत दुकान लावत आहे. मरकड यांनी मनाचा मोठेपणा दाखवून वेगळा विषय काढू नये. नासीर शेख म्हणाले की, मढी यात्रेतून आपल्याला एकतेचा संदेश द्यायचा असल्याने सर्वांनीच सामंजस्याची भूमिका घ्यावी.

या वेळी संजय मरकड म्हणाले की, हा विषय आता माझ्या अखत्यारीत राहिलेला नाही. या विषयवार दोन दिवसांत आपण सर्व बसून चर्चा करू व योग्य निर्णय घेऊ. या वेळी मते यांनी यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी एकोपा दाखवावा, तर खैरे म्हणाले की, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर पोलिस प्रशासन कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम करेल. प्रास्ताविक संतोष मुटकुळे यांनी, तर आभार संतोष खाडे यांनी मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news