

श्रीरामपूर: पत्नीला माहेरी श्रीरामपूरला न पाठवता नगरला मुलाबाळांसह राहण्याचा आग्रह केल्याने पती-पत्नीत झालेल्या भांडणातून पत्नीने तिच्या आईच्या मदतीने पतीला मारहाण करत गळा आवळून खून केल्याच्या संशयावरून शहर पोलिसात मृत तरुणाच्या पत्नी व सासूच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर येथे राहणारा सुनील शिंदे व त्याची पत्नी ताराबाई यांच्यात भांडण झाल्याने पत्नी ताराबाई दोन्ही मुलांना घेऊन माहेरी श्रीरामपूरला राहायला आली. नंतर सुनील शिंदे सासूरवाडीला आला. शहरात सुनील व त्याची पत्नी झोपडी करून वॉचमन म्हणून काम करत होते. मात्र पत्नीने नगरलाच राहायला यावे असा त्याचा आग्रह होता. त्यावरून त्यांचे भांडण होत होती.
एके दिवशी सुनीलच्या आई-वडिलांना साडूचा फोन आला, की सुनीलने विषारी औषध प्याले आहे. तेव्हा सुनीलचे आई, वडील श्रीरामपूरला आले. त्या वेळी सुनीलचा मृतदेह साखर कामगार हॉस्पीटलमध्ये होता. सुनीलने गळफास घेतल्याचे सांगण्यात आले.
तेव्हा घटनास्थळी जाऊन पाहिले असता तेथे कोठेही फाशी घेण्यासारखी जागा दिसली नाही. त्यामुळे सुनीलच्या वडिलांना संशय आला. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी (24 मार्चला) सुनीलच्या आई-वडिलांनी नातवाला विश्वासात घेऊन विचारले असता सुनीलला पत्नी व सासूने प्लास्टिक पाईपने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे समजले.
तो मारहाण झाल्यावर घराच्या बाजूला गेला, तेव्हा पत्नी व तिची आईदेखील त्याच्या मागे गेल्याचे नातवाने सांगितले. यावरून सुनीलचा कशाने तरी गळा दाबून त्याला ठार मारल्याचा संशय आला. त्यावरून सुनीलची आई यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.