

शिर्डी: ‘श्रध्दा सबुरी, भाजपाची महाभरारी’ हे ब्रिद घेवून, भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश अधिवेशनाची जय्यत तयारी श्रीसाईनगरीत करण्यात आली आहे. या औचित्याने संपूर्ण शिर्डी शहर भाजपमय झाले आहे. पक्षाच्या संघटनात्मक पदाधिकार्यांसह दिग्गज नेते शिर्डीत दाखल झाले आहेत. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अधिवेशनाची नियोजनबध्द तयारी करण्यात आली आहे.
शिर्डीमध्ये पक्षाचे प्रदेश अधिवेशन प्रथमच होत आहे. या अधिवेशनाला राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या महाविजयाची पार्श्वभूमी आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पुन्हा घवघवीत यश मिळविण्याचा निर्धार, या अधिवेशनात करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्य मंत्री मंडळातील भाजपाचे मंत्री शिर्डीमध्ये दाखल झाले आहेत. केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांचे आज रविवारी शिर्डीमध्ये आगमन होणार आहे. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिवेशनाचा समारोप होणार आहे.
अधिवेशनासाठी राज्यातील 20 हजार प्रतिनिधी उपस्थित राहतील, अशी शक्यता गृहीत धरुन, भव्य सभामंडपाची उभारणी प्रसादालया शेजारील प्रांगणावर केली आहे. मंत्री, आमदार व खासदार मंडळींची स्वतंत्र आसन व्यवस्था करण्यात आली आहे. उर्वरित सभा मंडपात राज्यभरातून येणारे प्रतिनिधी बसू शकतील, अशी व्यवस्था केली आहे. शेजारील मंडपामध्ये व्हीआयपी भोजन कक्षासह सुमारे 20 हजार प्रतिनिधींच्या भोजनाची व्यवस्था केली आहे.
राजकीय ठराव संमत होणार!
श्रीक्षेत्र शिर्डी शहरामध्ये भाजपाच्या स्वागताच्या कमाणींसह ठिक-ठिकाणी पक्षाचे झेंडे लावले आहे. संपूर्ण श्रीसाईनगरी भाजपमय झाल्याचे चित्र दिसत आहे. सकाळी 9.30 वा. अधिवेशनाचे उद्घाटन केंद्रीय नेत्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडले.दिवसभरात काही राजकीय ठराव या अधिवेशनात संमत करण्यात येणार आहेत. सायंकाळी अधिवेशनाचा समारोप केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थित होणार आहे.