श्रीरामपूर : नगरपालिकेने सुरू केलेले अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर जर कोणी पुन्हा अतिक्रमण केल्याचे आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी दिला. काल दुसर्या दिवशी पालिकेने सय्यद बाबा दगडापासून ते गोंधवणी गावापर्यंतचे दोन्ही बाजूची अतिक्रमण काढले. यात येथील दुकानदारांनी स्वतःहून अतिक्रमणे काढल्याने अतिक्रमण काढणे सहज सोपे झाल्याचेही घोलप यांनी सांगितले.
काल सकाळी दहा वाजता सय्यद बाबा चौकापासून दुकानदारांची पुढे आलेली अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आली. मंगळवारी बेलापूर रोडवरील अतिक्रमणे काढल्यानंतर सय्यद बाबा चौकापासून गोंधवणी गावापर्यंतच्या सर्वच लोकांनी आपापली दुकाने रात्री रिकामी केली होती. तर बर्याच लोकांनी आपले शेड देखील काढून घेतले होते. दुकाने, टपर्या, शेड अस्तित्वात होते ते जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करण्यात आले.
सिंधी मंदिरासमोरील नगरपालिकेच्या गाळ्यांचे सर्व शेडस काढून टाकण्यात आले. सिंधी कॉलनीतील अनेक घरे पाडण्यात आली. या ठिकाणी मोठे नुकसान पहावयास मिळाले.
गोंधवणी पुलापासून पुढे पेट्रोल पंपापासून पाण्याच्या टाकीपर्यंत असलेली सर्व अतिक्रमणे जमीनदोस्त करताना या ठिकाणी राहणार्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले .
गोंधवणी रस्ता हा अतिक्रमणामुळे पूर्णपणे व्यापला गेला होता. परंतु काल तो मोकळा करण्यात आला. श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटी शाळेची इमारत काल पहिल्यांदा रस्त्यावरून दिसायला लागली. त्या बाजूची सर्व दुकाने, टपर्या या काढण्यात आल्या. नगरपालिका लेबर कॉलनी समोरील अतिक्रमणे देखील काढण्यात आली. त्यामुळे पुढे बांधलेली घरकुल वसाहत मोकळी झाली .
शहरातील या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गेली अनेक वर्षे अतिक्रमणे वाढली होती. राज्यमार्ग असूनही हा रस्ता पूर्णपणे झाकला गेला होता, तो काल मोकळा झाला.
नगरपालिकेने सुरू केलेली ही मोहीम पंधरा दिवस तरी सुरू राहणार आहे. यामध्ये मुख्य रस्त्यांसह उपनगरातील इतर डीपी रस्ते सुद्धा मोकळे करण्यात येणार आहे.
रात्रभर जागून काढले सामान
मंगळवारी बेलापूर रोडची अतिक्रमणे काढल्यानंतर शहरातील सर्वच रस्त्यावरील दुकानदारांनी आपापले पुढे आलेले शेड्स, बोर्ड काढून घेण्यास सुरुवात केली होती. काल रात्रभर शहरातील सर्वच रस्त्यांवर सामान हलविण्याचे काम सुरू होते. महात्मा गांधी चौक, राम मंदिर चौक,नेहरू मार्केट समोरील बागवानांची दुकाने,शिवाजी महाराज चौक, पूर्ण नेवासा व संगमनेर रस्ता येथील सर्व अतिक्रमणे नागरिकांनी जवळजवळ काढून घेतली आहे.