

तालुक्यात सुरू असलेल्या जलजीवन योजनेचा फज्जा उडाला असून, अधिकारी आणि ठेकेदार यांचे खिसे भरण्यासाठीच ही योजना सुरू असल्याची चर्चा सुरू आहे.
सुमारे 45 कोटी रुपये खर्च करून 32 गावांमध्ये ही योजना एक वर्षात पूर्ण करून घरोघरी नळाने पाणीपुरवठा करण्याचा सरकारचा संकल्प होता. प्रत्यक्ष काम सुरू होऊन अडीच वर्षे उलटले आहेत. अद्यापपर्यंत कुठल्याच घरात नळ पोहोचला नाही. अडीच वर्षे उलटूनही पन्नास टक्केही काम पूर्ण झालेले नाही. ठेकेदारावर संबंधित यंत्रणेचा अंकुश राहिला नसल्याने मनमानी व चुकीच्या पद्धतीने कामे करून फक्त बिले काढण्याचा खटाटोप सुरू आहे.
अनेक ठिकाणी पूर्वीच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असतानाच पुन्हा जलजीवन योजनेंतर्गत विनाकारण कोट्यवधींचा खर्च करून सरकारचा निधी ठेकेदाराच्या व अधिकार्यांच्या खिशात घातला जात आहे. या योजनेत अनेक ठिकाणी बेकायदेशीर कामे केल्याने अनेक तक्रारी झाल्या आहेत. संबंधित विभागाचे अधिकारी या संदर्भात चुकीची माहिती देऊन नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत.
तालुक्यातील आल्हनवाडी, कासार पिंपळगाव, पत्र्याचा तांडा, चितळवाडी, लांडकवाडी, धामणगाव, वडगाव, कोरडगाव, मिरी, धनगरवाडी, केळवंडी, गितेवाडी, सोमठाणे खुर्द, रांजणी, जोगेवाडी, कामत शिंगवे, मोहरी, मानेवाडी, जवखेडे दुमाला, ढवळेवाडी, कारेगाव, हनुमान टाकळी, शिरसाटवाडी, बोरसेवाडी, माणिकदौंडी, घुमटवाडी, डमाळवाडी, कोपरे, ढाकणवाडी, जाटदेवळे, चिंचपूर पांगुळ व मढी अशा 32 गावांमध्ये सुमारे 44 कोटी 23 लाख 62 हजार 941 रुपये खर्च करून घरोघर पाणी देण्याचा सरकारचा मनोदय आहे. जून 2022मध्ये या कामांना वर्क ऑर्डर देण्यात आलेले आहेत. तब्बल अडीच वर्षे उलटूनही सोमठाणे व ढवळेवाडी अशा दोन गावांची योजना पूर्ण झाल्याचे संबंधित यंत्रणांकडून सांगितले जात आहे. प्रत्यक्षात मात्र या दोन्ही गावांतील नागरिकांना पाणी मिळालेले नाही.
जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंता अनिल सानप यांच्याकडे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा पाथर्डी व शेवगाव दोन्ही तालुक्यांचा प्रभारी पदभार आहे. जलजीवन योजनेचा सर्व कार्यभार त्यांच्याकडे असून, तालुक्यातील या योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे. या योजनेविषयी माहिती घेण्यासाठी व तक्रारी करण्यासाठी गावातील सरपंच, पदाधिकारी पंचायत समितीतील कार्यालयात येतात. मात्र, संबंधित अधिकारी कार्यालयात कधीच उपस्थित राहत नाहीत. योजनेविषयी माहिती द्यायला नको म्हणून त्यांचे दोन्हीही मोबाईल नेहमी बंद असतात.