पांढरं सोनं वेचणीकडे मजुरांची पाठ

दहा ते बारा रुपये प्रति किलो मजुरी देऊनही मजूर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत
cotton
कापूस वेचणीसाठी मजुरांची वानवाpudhari
Published on: 
Updated on: 

तालुक्यात कापूस वेचणीसाठी मजुरांची वानवा जाणवत आहे. त्यामुळे कपाशी उत्पादक अडचणीत सापडले आहेत. वाढीव दर देऊनही शेतकर्‍यांना कापूस वेचणीसाठी मजूर मिळेनात. खरिपातील कापूस वेचणीस आला असून पांढरे सोनं म्हणून ओळख असलेल्या कपाशीची वेचणी करण्यास मंजुराची वानवा आहे. दहा ते बारा रुपये प्रति किलो मजुरी देऊनही मजूर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जावे का कापूस वेचावा? या विवेंचनेत कार्यकर्ते असलेले शेतमजूर आहेत.

तालुक्यातील सर्व शेतकरी कापूस वेचणीस व्यस्त आहेत. त्यात दिवाळी, पाडवा, भाऊबीजेची धामधूम असल्याने शेतमजुरांचा तुटवडा निर्माण झाला आहे. शेतमजुरांकडून मजुरीचे दर वाढविण्याची मागणी करीत आहेत. शेतमजुरांचा तुटवडा निर्माण झाल्याने वेळेवर मजूर मिळावेत, म्हणून शेतकरी कापूस वेचणीसाठी दहा रुपयापासून पंधरा रुपयांपर्यंत मजुरी देण्यास देखील तयार होत आहेत. या हंगामाच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने खरिपातील सर्वच पिके जोमात आली होती. त्यामुळे शेतकर्‍यांनी आधिकचे उत्पन्न मिळावे, म्हणून पिकांची मशागत व रासायनिक खते औषध यावर मोठा खर्च केला. मात्र, त्यानंतर सतत अवेळी झालेल्या अतिवृष्टीने परिसरातील कपाशी पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला.

कापसात उन्हामुळे घट होऊ नये, म्हणून शेतकरी शेतमजुरांच्या दारी खेट्या मारत असल्याचे चित्र दिसत आहे. दिवाळीमुळे शेतात काम करण्यासाठी कोणीही येत नसल्याने शेतकरी कुटुंबांना दिवाळी शेतातच साजरी करावी लागली आहे.

वाहनचालक झाले ठेकेदार!

अनेक गावांतील काही मजूर परगावी जाऊन काम करीत आहेत. यात वाहनचालकाकडे 15 ते 20 मजुरांचा टोळी असते. तो चालक शेतकर्‍याकडून आधीचे पैसे घेऊन मजुरांना घेऊन जातो. त्यात त्याच्या वाहनाचेही भाडे द्यावे लागत आहे.

कपाशीची लागवडीसाठी मोठा खर्च केला. मात्र,आता कापूस वेचणीसाठी आठवड्यापासून मजुराच्या घरी खेट्या मारत आहे.अद्याप मजूर होकार देत नाहीत. मजुराअभावी अद्याप कापूस शेतातच झाडाला लटकलेला आहे.

विनायक जाधव, प्रगतशील शेतकरी, गोंडेगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news