

नेवासा: तालुक्यातील साखर कारखान्यांचे गळीत हंगाम लवकरच संपल्याने आता ऊसतोडणी मजूर परतीच्या मार्गावर निघाले आहेत. झाली तोडणी ऊसाची, धरली वाट घराची, असे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.
यंदा विधानसभेच्या निवडणुकीमुळे गळीत हंगाम उशिरा सुरू झाले. दरम्यान, अनेक मजूर राज्यातील कारखाने सुरू होण्याची वाट न पाहता राज्याबाहेर गेले होते. काही कामगारांनी दिवाळी व निवडणुकीत मतदान करून ऑक्टोबर महिन्यात कारखान्याचा रस्ता धरला.
मात्र,उशिरा सुरू झालेले हंगाम लवकर संपल्याने अनेक कारखाने बंद झाले आहेत. पट्टा पडल्याने अनेक मजूर आपापल्या गावांकडे रवाना होताना दिसत आहेत. दरम्यान, तालुक्यातील ज्ञानेश्वर व मुळा साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाची सांगता झाली आहे.
तालुक्याबाहेरून व परिसरातून अनेक मजूर व छोटे शेतकरी उचल घेऊन ऊस तोडायला जातात. चार महिने हंगाम चालतो. त्यानंतर हे मजूर गावाकडे येतात. गेल्यावर्षी ऊसलागवड कमी असल्याने यंदा हंगाम लवकर संपले. पुढच्या वर्षी मात्र मोठ्या प्रमाणात ऊस क्षेत्र आहे.
ऑगस्टपासूनच कामगारांना उचल देऊन कोयते ठरवले जाते. दसर्याला मजूर कारखान्यावर जातात.मजुरांचे वर्षभराचे आर्थिक गणित, देणेघेणे, लग्नकार्य आधी कामे उचलीच्या पैशावर उरकली जातात. सणउत्सवही उसाच्या फडातच साजरे केले जातात. ऊसतोड हंगाम मंजुरांसाठी पर्वणीच असतो. दरम्यान, ऊसतोडणीहून आल्यानंतर मजुरांच्या हाताला कामही राहत नाही. त्यामुळे दोन-चार महिने मजुरांना परिसरात रोजगार शोधावा लागतो.
ग्रामीण बाजारपेठा ओस
ऊसतोडणी मजूर कारखान्यावर गेल्याने तीन-चार महिने वाड्या-वस्त्यांवर शुकशुकाट असतो. वृद्ध मुलेबाळे, घर राखणीला असतात. दुसरीकडे गावालगतचा परिसर ऊसतोडणी मजुरांनी गजबजलेला असतो. आता मजूर परतू लागल्याने ग्रामीण भागात बाजारपेठा मोकळया वाटू लागल्या आहेत.