

कर्जत: तालुक्यामधील शेगुड येथील प्राथमिक शाळेत तीन वर्षांपासून शिक्षक नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शनिवारी (दि. 28) कर्जत पंचायत समितीच्या गटशिक्षणधिकार्यांच्या दालनात शाळा भरवून त्यांचे लक्ष वेधले.
शेगुड प्राथमिक शाळेला तीन वर्षांपासून शिक्षक मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे संतप्त पालक आणि विद्यार्थ्यांनी आज थेट पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकार्यांच्या दालनात धाव घेऊन ठिय्या मांडला. आम्ही रोज शाळेमध्ये जातो, पण शिक्षक नसल्यामुळे केवळ भात खाऊनच घरी येतो, असे विद्यार्थी यावेळी म्हणाले. उपस्थित पालकांनी शिक्षक मिळाल्याशिवाय आता आम्ही परत जाणार नाही अशी भूमिका घेतली होती.
अखेर त्या शाळेवर तात्काळ एका शिक्षकाची नेमणूक गटशिक्षणाधिकारी प्रदीप चव्हाण यांना करावी लागली. यावेळी सरपंच शांतीलाल मासाळ, संदीप शेगडे, राजेंद्र नलवडे, बबन शिरसाट, भाऊ कोकाटे, माधव शेगडे, मंगेश गोरे, गणेश पांढरे व ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी त्याच ठिकाणी जोरात पाढे म्हणण्यास सुरुवात केल्यामुळे सर्व पंचायत समिती दणाणून सोडली होती.