विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी (बुधवारी) तालुक्यातील शिरसाटवाडी येथील मतदान केंद्रावर आमदार मोनिका राजळे यांच्यावर जमावांकडून झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ कासार पिंपळगाव येथे कडकडीत बंद पाळून निषेध सभा घेण्यात आली. यावेळी गावात व हद्दीतील वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सर्व व्यवहार बंद ठेवून गावातून मूकमोर्चा काढण्यात आला. हा हल्ला आमदार राजळे यांच्यावरील नसून, तो लोकशाहीवर असल्याचे सांगत एका महिलेवर भ्याड हल्ला करणार्यांचा निषेध केला. या मोर्चात सर्वपक्षिय ग्रामस्थ, तरुणांसह महिलांही सहभागी झाल्या होत्या.
सेवा संस्थेचे अध्यक्ष वसंत भगत म्हणाले, लोकशाही मान्य नसलेली ही प्रवृत्ती आहे. आपल्याला मतदान होत नसल्याच्या रागातून हे कृत्य झाले आहे. एका महिलेला मिळालेली ही वागणूक माणूसकीला काळीमा फासणारी आहे. सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामदास म्हस्के म्हणाले, राजळे कुटुंब शालिनता जपत राजकारण करीत आहे. कोणावरही टीकाटिपण्णी न करता केवळ केलेली विकासकामे पक्षीय ध्येयधोरणे सांगत केलेला प्रचार, प्रसाराने मिळालेला जनाधार विरोधकांना रुचत नाही, हे दुर्दैव आहे. संभाजी राजळे, सुनील राजळे, सुनील मरकड, अनंत राजळे आदींनी भावना व्यक्त केल्या. ग्रामस्थांनी हात उंचावून प्रसंगी निषेधाच्या घोषणा दिल्या.गावांतील बाराबलुते व्यवसाय, किराणा दुकानांसह शेतीची कामेही दिवसभर बंद ठेवण्यात आली.
शिरसाटवाडी येथे मतदान केंद्रावर आमदार मोनिका राजळे यांच्यावर अचानक दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात त्या किरकोळ जखमी झाल्या. मात्र, पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवताना त्यांनी स्पष्ट सांगितले, की ‘माझं शरीर जखमी झालं तरी हरकत नाही, पण या मुलांचं भविष्य उद्ध्वस्त होता कामा नये. तरुण मुले चुकू शकतात; पण त्यांचे भवितव्य उद्ध्वस्त होऊ नये.’ या भूमिकेमुळे मोनिका राजळे यांच्या सहनशीलतेचा, माणुसकीचा आणि मोठेपणाचा प्रत्यय आल्याची चर्चा तालुक्यात सुरू झाली. ‘राजकारणात सत्ता महत्त्वाची असते; पण माणुसकीचं स्थान त्याहून मोठं असतं,’ अशी प्रतिक्रिया आमदार राजळे यांनी नंतर व्यक्त केली.